ध्येय निर्धारण (Goal Setting ) भाग - ३
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
"एका व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या समूहाने दूरदृष्टीने पाहिलेले, सुनियोजितपणे आखलेले आणि ठराविक समय सीमेत अपेक्षित परिणाम मिळविण्याच्या दिशेने केलेले एक प्रेरक चिंतन म्हणजे 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' असते."
या व्याख्येतील पहिल्या तीन अटींवर आपण मागील अंकात चिंतन केले, आज उर्वरित ४ अटींवर आज विचार करूया -
चौथी अट आहे ध्येय कधी पूर्ण व्हायला हवे ? उत्तर आहे ध्येय ठराविक समय सीमेत पूर्ण व्हायला हवे. ध्येय-निर्धारण करतांना,ते साध्य करण्याची वेळ ठरवणे अतिशय गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर ध्येय साध्य झाले तरी त्याचे महत्व उरत नाही, म्हणून वेळ ठरविणे अतिशय गरजेचे असते. व्यवसायात समय-सीमेला अत्यधिक महत्व असते, एखादे काम किंवा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झाले नाही, तर नुकसान सुरू होते आणि ते जितक्या उशिरा पूर्ण होईल, तितके नुकसान अधिक होत जाते कारण आपण योजना आखतांना, त्यात मजूरी किती लागणार, आवश्यक उपकरणांचे भाडे किती लागणार, कर्ज घेतले असल्यास व्याज किती लागणार हे सर्व जोडून त्या प्रोजेक्टची किंमत ठरवतो. आता जर काही कारणांमुळे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झाला नाही तरी मजूरी, भाडे, व्याज हे चालूच राहते व त्यामुळे नुकसान व्हायला सुरुवात होते. वेळ किंवा समयसीमा ठरविली नाही तर आपण दिशाहीन भटकत राहतो, म्हणून ध्येय-निर्धारण करतांना ध्येय-पूर्तीची समय-सीमा ठरविणे अतिशय महत्वाचे आणि गरजेचे आहे.
पाचवी अट आहे - ध्येय निर्धारण कशासाठी करावे ? उत्तर आहे अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी, यशाचे शिखर गाठण्यासाठी ध्येय निर्धारण करावे. अपेक्षित परिणाम मिळविणे किंवा यशाचे शिखर गाठणे म्हणजे नक्की काय असते? आपल्याला जीवनांत , व्यवसायात, नोकरीत आपल्याला कुठपर्यंत पोचायचे आहे, काय-काय मिळवायचे आहे? एखादे मोठे पद, मोटार , बंगला, फार्महाऊस, 6 आकडी मासिक पगार या सर्व सामान्य माणसांच्या ईच्छा असतात व हे त्याला मिळावे अशी त्याची अपेक्षा असते. या अपेक्षापूर्तीलाच अपेक्षित परिणाम मिळविणे किंवा यशाचे शिखर गाठणे म्हणतात. ह्या अपेक्षा तेव्हांच पूर्ण होतात जेव्हां आपण त्यांना ध्येय म्हणून ठरवतो आणि हे ध्येय तेव्हांच साध्य होते जेव्हां आपण ते मिळविण्याच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करतो. ध्येय ठरविल्याने आपल्याला पुढचे पाऊल उचलण्यासाठी दिशा मिळते, म्हणून ध्येय ठरविणे अतिशय गरजेचे आहे.
अगदी सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा आपल्या घरी कुणाच्या लग्नाच्या तयारीला आपण कधी लागतो ? उत्तर आहे विवाह ठरल्यावर आपण त्याच्या तयारीला लागतो. लग्नाला जर एक 'ध्येय' मानल्यास, ते आधी ठरते, त्यानंतर तो विवाह सोहळा कधी, कुठे, कोणत्या पद्धतीने (आजकाल आंतरजातीय विवाह अधिक होत असल्याने हे देखील ठरवावे लागते), किती खर्चात, किती दिवसांचा होईल, त्यात कोण-कोण उपस्थित राहील, पाहुण्यांसाठी कोणत्या सोयी कराव्या लागतील या सर्व कामांना दिशा तेव्हांच मिळते जेव्हां ते ठरते ! लग्नाला जर 'ध्येय' म्हंटले तर हे ध्येय ठरविल्याने पुढील तयारीला दिशा मिळते आणि अपेक्षित परिणाम 'शुभ-विवाह' हे साध्य होते.
पुढील सहावी अट आहे- ध्येय-निर्धारण करतांना काय-काय करायचे असते ? उत्तर आहे चिंतन करणे, योजना आखणी करणे, रणनीती ठरवणे, मार्गात येणाऱ्या अडचणींना मात देण्यासाठी विचार करणे, हे सर्व ध्येय-निर्धारण करतांना करायचे असते.
मागील दिलेल्या लग्नाच्या उदाहरणाने हे देखील समजून घेऊया. लग्न ठरले की त्याची समय सीमा (Deadline ) ठरते. मग विवाह-मुहूर्त (Deadline ) गाठण्यासाठी आपण कामांची यादी बनवतो व त्यांची प्राथमिकतेच्या आधारावर विभागणी करतो. सर्वात आधी आपण कार्यस्थळ, गुरुजी, वेडिंग प्लॅनर, कॅटरर ठरवतो. त्यानंतर पाहुण्यांची यादी, आमंत्रण-पत्रिका इतर कामे करतो, वर-वधू विविध विधी करतांना कोणते कपडे घालणार, कोणती आभूषणे घालणार, कोणत्या पाहुण्यांना कुठे थांबविणार, मेन्यू काय-काय असणार, हे सर्व ठरवतो व त्याप्रमाणे खरेदी करतो, व्यवस्था करतो, बॅग भरतो म्हणजे थोडक्यात योजना आखणी करतो, रणनीती ठरवतो. रिसेप्शन किंवा लग्न गार्डन मध्ये होणार असले आणि पावसाळ्याच्या दिवसांत लग्न असेल तर आपण पाऊस आल्यास किंवा उन्हाळ्यात असेल तर उन्हा पासून जपायसाठी वैकल्पिक व्यवस्था करून ठेवतो, म्हणजे आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींना मात देण्यासाठी आधीच विचार करून ठेवतो. परिणामी आपल्या येथील विवाह-सोहळा निर्विघ्नपणे व यशस्वीरीत्या पार पडतो.
ध्येय-निर्धारणासाठी शेवटली अट आहे - ध्येय-निर्धारण करतांना चिंतन कसे असावे ? उत्तर आहे, ध्येय-निर्धारण करतांना चिंतन 'प्रेरक' आणि 'सकारात्मक' असणे गरजेचे आहे. आपल्याला ध्येयाच्या दिशेने प्रवृत्त करण्यासाठी सकारात्मक आणि प्रेरक चिंतन 'उत्प्रेरका' प्रमाणे काम करते आणि आपली ध्येयाच्या दिशेने चालण्याची गति वाढवते. ज्या प्रमाणे एखादे उत्प्रेरक, स्वत: प्रत्यक्ष क्रियेत भाग न घेता एखाद्या रासायनिक क्रियेची गति वाढवते त्याच प्रमाणे आपले सकारात्मक आणि प्रेरक चिंतन आपली ध्येयाच्या दिशेने चालण्याची गति वाढवते. प्रेरक आणि सकारात्मक चिंतनाने आपला आत्मविश्वास बळावतो, आपला आपण पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्णतेवर, आपण ठरविलेल्या ध्येयाच्या पूर्णतेवर विश्वास दृढ होत जातो, आपल्याला मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जाऊन त्यांच्यावर मात करण्याचे बळ मिळते ज्यामुळे ध्येय-प्राप्ति अगदी सहज होते. म्हणून ध्येय-निर्धारण करतांना, ध्येयाच्या वाटेवर चालतांना आपले चिंतन प्रेरक आणि सकारात्मक असणे अतिशय गरजेचे आहे.
पुढील अंकांपासून ध्येय-निर्धारण ( Goal Setting) या संकल्पनेला आणखी खोलात जाऊन समजून घेऊया.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥