ध्येय निर्धारण (Goal Setting ) भाग -२
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
मागील अंकात आपण पाहिले की 'अपेक्षित परिणाम मिळविणे' अर्थात 'यशाचे शिखर गाठणे' हा एकमात्र अर्थ आपण 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' या शब्दाचा घेतो पण 'यशाचे शिखर गाठण्यासाठी' या एकमात्र अर्था शिवाय अन्य आवश्यक ७ अटी पूर्ण करण्यासाठी कष्ट/ परिश्रम घेत नाही, म्हणून 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' मिळविणे कठीण किंवा अशक्य वाटू लागते व आपण ध्येयाची वाट सोडून देतो, परिणामी आपण ठरविलेले 'ध्येय' एक 'अपूर्ण इच्छा' बनून राहून जाते. पण आपण जर ध्येय ठरवितांना आणि ध्येयाच्या वाटेवर चालतांना मागील अंकात 'ध्येय' या संकल्पनेच्या सोप्या व्याख्येतील सात ही अटींचा विचार केल्यास 'ध्येय' गाठणे शक्य होते. आपल्याला संदर्भ लागावा म्हणून एकदा पुन्हा ती व्याख्या खाली देत आहे-
"एका व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या समूहाने दूरदृष्टीने पाहिलेले, सुनियोजितपणे आखलेले आणि ठराविक समय सीमेत अपेक्षित परिणाम मिळविण्याच्या दिशेने केलेले एक प्रेरक चिंतन म्हणजे 'ध्येय' किंवा 'लक्ष्य' असते."
या व्याख्येतील पहिल्या तीन अटींवर आज विचार करूया -
पहिली अट आहे - ध्येय निर्धारण कोण करतो ? उत्तर आहे 'व्यक्ति' किंवा 'व्यक्तींचा समूह' ध्येय निर्धारण करतो. स्पष्ट आहे एक व्यक्ति आपले स्वत: चे 'वैयक्तिक ध्येय' (Personnel Goal ) ठरवतो आणि व्यक्तींचा समूह मिळून आपल्या समूहाचे, आपल्या संघटनेचे 'संघटनात्मक ध्येय' (Organizational Goal) ठरवतात. म्हणून आपण आपले वैयक्तिक ध्येय ठरवीत आहोत की आपल्या समूहाचे, आपल्या संघटनेचे संघटनात्मक ध्येय ठरवीत आहोत याचा आधी विचार करणे गरजेचे आहे.
आपल्या स्वत:च्या क्षमता, आपले स्वत:चे ज्ञान, कौशल्य, आपला स्वभाव , आपली दुर्बल स्थाने, आपण पूर्वी मिळविलेले लहान-मोठे यश-अपयश, आपल्या मार्गात आलेल्या अडचणी, त्या अडचणींना आपण कसे दूर केले, या सर्वांचा विचार जर आपण वैयक्तिक ध्येय ठरविताना केला तर आपले ध्येय नक्की पूर्ण होईल. पण याच सर्व बाबींचा विचार करून आपण आपल्या संघटनेचे संघटनात्मक ध्येय ठरविले, तर ते पूर्ण होणे शक्य नाही कारण आपण वैयक्तिक बाबींचा विचार करून समूहाचे ध्येय ठरविले होते. संघटनेचे ध्येय ठरवितांना संघटनेच्या प्रत्येक सदस्याच्या स्वभाव, ज्ञान, कौशल्ये, दुर्बल स्थाने, पूर्वीचे यश-अपयश, अडचणी या सर्व बाबींचा व्यक्ति-सापेक्ष विचार करणे गरजेचे आहे. आपण कुणाला गृहीत धरून त्याला जवाबदारी दिली तर तो व्यक्ति ती जवाबदारी चोख पार पाडेल याची खात्री नाही. याउलट संघटनेचे ध्येय ठरवितांना सर्वानी मिळून वरील सर्व अपेक्षित बाबींवर विचार करून, एकमत होऊन जर ध्येय ठरविले तर ते नक्की पूर्ण होईल. 
दुसरी अट आहे - ध्येय निर्धारण कसे करावे ? उत्तर आहे ध्येय निर्धारण दूरदृष्टीने करावे. दूरदृष्टीने म्हणजे ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक मैलाच्या दगडापर्यन्त आपली दृष्टी जाणे आवश्यक आहे, मार्गातील प्रत्येक पडावाचा विचार करणे गरजेचे आहे. यामुळे मार्गातील संभवित अडचणींचा विचार केला जातो आणि त्यांना दूर करण्याचा किंवा पर्यायी मार्गाचा आधीच विचार केला जातो. दूरदृष्टीने ध्येय-निर्धारण केल्यामुळे मार्गातील अडचणी आपले किंवा आपल्या समूहातील कुणाचेही मनोबल, आत्मविश्वास कमी होऊ देत नाही उलट आधी पासून विचार केल्यामुळे अडचणींना मात कशी द्यावी किंवा पर्यायी मार्ग निवडणे हे आधी पासूनच ठरलेले असल्यामुळे मनोबल आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो परिणामी ध्येयाच्या दिशेने आपली गति वाढते.
अगदी सोप्या उदाहरणाने या अटीला समजून घेऊया. आपण कार ने मुंबईहून नाशिक साठी निघतांना आपण फास्ट टेग रिचार्ज , मार्गात लागणारा ट्राफिक, अपेक्षित यात्रेची वेळ, पेट्रोल, चाकांमध्ये हवेचा दाब, अतिरिक्त चाक या सर्व बाबींचा विचार करून निघतो. सायंकाळी ट्राफिक अधिक असतो म्हणून आपण रात्री ८ नंतर किंवा सकाळी ६ वाजता निघतो, एवढे करूनही जर कसारा घाटावर ट्राफिक जाम असल्याचे कळले तर आपण आधीच पर्यायी मार्ग निवडून आपला वेळ आणि ताण दोन्ही वाचवतो नं ? यालाच दूरदृष्टी म्हणतात. या उलट आपल्या कार मध्ये असलेले अतिरिक्त चाक पंचर किंवा खराब असेल, पेट्रोल कमी असेल आणि आपण प्रवास सुरू करतांना याची दखल नाही घेतली. वाटेत आपल्या कारचे चाक पंचर झाले तर आपला प्रवास दूरदृष्टिपूर्ण नव्हता हे सिद्ध होते कारण आपण मार्गात येणाऱ्या सामान्य अडचणींचा देखील विचार केला नाही.
तिसरी अट आहे - कोणत्या पद्धतीने ध्येय निर्धारण करावे ? उत्तर आहे सुनियोजित पद्धतीने ध्येय निर्धारण करावे. कुठल्याही प्रकल्पासाठी किंवा परियोजनेसाठी 'नियोजन' (Planning ) सर्वाधिक महत्वाचे आहे, आणि नियोजन जर उत्तमपणे झाले तर यश गाठणे अगदी सहज शक्य होते. नियोजन करतांना ध्येय-मार्गातील प्रत्येक टप्प्याचा विचार केला जातो, कोण, कधी, काय , कुठे, कसे, कशासाठी या सर्व प्रश्नांवर विचार करूनच ध्येय ठरवून , ध्येयाच्या दिशेने चालायला सुरुवात होते. यालाच उत्तम नियोजन म्हणतात.
अगदी सोप्या उदाहरणाने या ही अटीला समजून घेऊया. समजा आपल्याला दिल्ली हून कन्याकुमारीला जायचे असले तर आपण कोण-कोण जाणार? कधी जाणार ? ट्रेन/फ्लाइट चे आरक्षण, सामानाची पॅकिंग, खर्चासाठी अपेक्षित रक्कम, रस्त्यात लागणारी शिदोरी, पाणी ईतर काय-काय अपेक्षित आहे ? आरक्षण कुठून होईल, खर्चासाठी पैसे कुठून आणायचे, प्रवासात लागणाऱ्या वस्तु कुठून आणायच्या ईतर सर्व कुठे मिळेल ? आरक्षण कसे होईल, स्टेशनवर/एअरपोर्ट वर कसे जाणार ईतर व्यवस्था कश्या होतील ? कन्याकुमारीला कां जायचे आहे ? ईतर सर्व बाबींचा विचार करूनच आपण दिल्लीहून कन्याकुमारीला जायचे नियोजन करतो. त्याचप्रमाणे आज जेथे आपण आहोत तेथून ध्येया पर्यन्त पोचण्यासाठी उत्तम नियोजन करणे अतिशय महत्वाचे आहे. असे म्हणतात की "Well Planned is Half Done" किंवा " Well Begun is Half Done" अर्थात उत्तम नियोजनामुळे किंवा उत्तम सुरुवातीमुळे ध्येयाचा अर्धा टप्पा गाठला जातो. उत्तम सुरुवात ही केवळ उत्तम नियोजनामुळेच संभव होते.
पुढील अंकात उर्वरित चार अटींवर विचार करूया.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥


सोप्या भाषेत उदाहरण देऊन तुम्ही जे सांगतात, ते खूप छान पद्धतिने समझता येत... 👌🏻👍🏻
ReplyDelete