Total Pageviews

Wednesday, October 12, 2016

काम वेळेवारी पूर्ण करण्यासाठी काय करावे ? वेळ-व्यवस्थापन भाग-२२ (Time Management Part-22)

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सादर वंदन !

मागील अंकात आपण आपल्या वेळेच्या परिणामकारकपणे इष्टतम उपयोगासाठी (Optimum Utilization) आपली दैनंदिन कृती-योजना आखणी आणि आपल्या कामाला ठराविक वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे यावर चिंतन केले. आपण बघितले की आपल्या कामांची यादी बनवून त्यांची विभागणी आजची कामे, आठवड्यात करायची कामे आणि महिनाभरांत करायची कामे या तीन भागांत केल्याने कामांचे प्राधान्यक्रम ठरविणे तर सोपे जातेच कुठलेही काम स्मृतीवर अवलंबून नसल्यामुळे विसरण्याची शक्यता राहत नाही आणि प्रत्येक काम पूर्ण होऊ लागते.  कामांची यादी आणि विभागणी झाल्यावर त्या कामांना करण्यासाठी कृती-योजना (Action Plan) ठरवतांना प्रत्येक कामापासून आपल्याला मिळणारा अपेक्षित परिणाम आणि त्या कामासाठी लागणारी अनुमानित अवधी यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे कारण या दोन्हीं मुळेच आपल्या मनात प्रत्येक कामाला वेळेवारी पूर्ण करण्याची ईच्छा जागृत होते आणि कुठलेही कार्य मनापासून करायला गेलो की त्यांत नक्कीच यश मिळते.

अनेकवेळा आपण कामांची यादी बनविली, त्याची योग्य विभागणी केली तरी काम सुरु कसे करावे हे आपल्याला कळत नाही किंवा काम सुरु करायची ईच्छाच मनांत जागृत होत नाही परिणामी कामांचा ढीग वाढत जातो आणि कुठून आणि कसे सुरु करावे हे समजत नाही आणि मनांत नैराश्य उत्पन्न होऊ लागते. अश्यावेळी खालील पद्धतीने काम करायचा प्रयत्न करायला हवा-
  • सर्वप्रथम आपल्या कृती-योजनेतील प्राथमिकतेनुसार सर्वात महत्वाचे कार्य निवडावे आणि त्याच्या पुढे लिहिलेली कामाची अनुमानित अवधी आणि त्या कामाने होणारे अपेक्षित परिणाम यांना लक्षपूर्वक वाचावे. कामाची अनुमानित अवधी जर एक तासाहून अधिक असली तर त्या अवधीचे एक-एक तासाचे भाग करावे. उदाहरणार्थ एकाद्या कामाला लागणारा अनुमानित वेळ आपण दीड तास ठरविला आहे तर त्या कामाला आपण एक तास आणि अर्धा तास अश्या  दोन टप्प्यात करायचे ठरवूया. अनुमानित अवधी जर दोन तासाहून अधिक असली तर एक-एक तासाच्या टप्प्यांमध्ये त्या कामाची विभागणी करावी.
  • या नंतर एक तासाच्या अवधीला ४ भागांमध्ये वाटावे - पाच मिनिटे , पाच मिनिटे , पंचेचाळीस मिनिटे आणि पाच मिनिटे.
  • पहिली  पाच मिनिटे आपल्याला ते काम करण्यासाठी मानसिक तयारीसाठी द्यावी. ज्याप्रमाणे 'बी' पेरण्याआधी जमिनीची मशागत करावी लागते त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या कामाचे अपेक्षित परिणाम मिळो यासाठी आपल्याला ते काम करण्याची मानसिक तयारी करायला हवी जेणेकरून आपल्या मनांत काम करण्याची ईच्छा-शक्ती जागृत होईल.  मानसिक तयारी कशी करावी ?  पाच मिनिटे आपल्याला जे आवडत असेल ते करावे उदाहरणार्थ एखादे गाणे ऐकावे, एखादा जोक आठवावा, एखादा मजेदार व्हिडीओ पाहावा , एखाद्या आवडत्या मित्राशी किंवा व्यक्तीशी फोनवर गोष्टी कराव्या. जे केल्याने आपला मूड 'फ्रेश' होईल असे काही तरी  करावे पण वेळेची मर्यादा ध्यानांत ठेवून केवळ ५ मिनिटेच आपल्या मूड ला 'फ्रेश' करण्यासाठी द्यावीत. आवडत्या छंदात अडकल्याने आपले काम एकीकडे राहून जाईल.
  • मूड 'फ्रेश' झाल्यानंतर पुढील पाच मिनिटात आपले लक्ष वेधणाऱ्या प्रत्येक वस्तूला आपल्यापासून दूर करावे. उदाहरणार्थ इंटरनेट, मोबाईल, टीव्ही, फोन , फेसबुक, ट्वीटर, whats app, मेल या सर्व आपली शांतता भंग करणाऱ्या आपले ध्यान-भंग  करणाऱ्या प्रत्येक वस्तू पासून स्वत:ला मुक्त करून घ्यावे, जेणेकरून आपले लक्ष्य केवळ आपल्या कामावर केंद्रित करणे सोपे जाईल.  दीर्घ श्वसन  अथवा कपालभाती द्वारे या सर्वांपासून स्वत:ला मुक्त करून घेणे व कामावर ध्यान केंद्रित करणे सोपे जाते.
  • पुढील पंचेचाळीस मिनिटे केवळ आपल्या कामावर केंद्रित करावी. एकावेळी एकच काम हातात घ्यावे, मधून कितीही महत्वपूर्ण काम आठवले तरी ते करण्यासाठी प्रवृत्त होऊ नये , ते काम एका डायरीत लिहून घ्यावे आणि आपण करीत असलेल्या कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करावे. लक्ष केंद्रित करण्यासाठी जर आपल्या कानाला हेडफोन लावून अगदी कमी आवाजात वाद्य संगीत एकले तर ते आपली एकाग्रता वाढविण्यास फार उपयोगी सिद्ध होते पण ध्यानांत ठेवावे की संगीत अगदी कमी आवाजात वाजवावे.  असे केल्याने आपल्या कामाची गती वाढते आणि अपेक्षित परिणाम मिळणे आणखी सोपे होते.
  • कामाची अनुमानित अवधी तास भर असल्यास ते काम पंचेचाळीस मिनिटात नक्की पूर्ण होईल. अनुमानित अवधी एक तासाहून अधिक असल्यास पंचेचाळीस मिनिटे सतत काम केल्यानंतर पाच मिनीटाची विश्रांती घ्यावी. विश्रांती घेण्यासाठी आपल्या सभोवतीच्या वातावरणांत परिवर्तन आणायला हवे, यासाठी आपल्या कामाच्या जागेवरून उठून दुसरीकडे जावे. अश्याने आपल्याला त्या कामाच्या तणावापासून मुक्त होणे शक्य होते. काम पूर्ण झाले तरी काम बरोबर झाले की नाही, आपण योग्यरित्या काम केले की नाही, आपला  बॉस कामाने संतुष्ट होईल की नाही असे बरेच प्रश्न मनांत उद्भवतांत ज्यामुळे आपल्यावर मानसिक ताण पडतो. तणावाचा प्रतिकूल परिणाम पुढील कामांवर होऊ नये म्हणून स्वत:ला कामाच्या तणावापासून मुक्त करून घेणे आवश्यक आहे.  यासाठी आपल्या वातावरणांत बदल करून घ्यावा, जागेवरून उठून अन्यत्र जावे आणि थोडे पाणी प्यावे. सतत काम केल्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची मात्रा कमी होते, आपले उर्जा-स्तर कमी होते , ते पुन्हा मिळवून घेण्यासाठी पाणी अथवा एखादे पेय प्राशन करावे आणि पुढील कामासाठी तयार व्हावे.
  • कामाची अनुमानित अवधी एक तासाहून अधिक असली तर तास भरानंतर वरील प्रक्रिया पुन्हा दोहरवावी.
        अश्याप्रकारे वरील प्रयोग करून बघावा, काम करणे सोपे आणि आनंददायक तर वाटेलच , सर्व कामे निश्चित वेळात पूर्ण देखील होतील. 

          वेळ-व्यवस्थापनाच्या या श्रुंखलेला येथेच विराम देत आहे. लवकरच पुढील विषयाला सुरुवात करूया.  वेळ-व्यवस्थापना विषयी काही शंका किंवा एखादा पैलू सुटलेला वाटत असल्यास अवश्य कळवावे, समाधान शोधण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


Wednesday, October 5, 2016

आपली दैनन्दिन कृति-योजना आखणी कशी करावी ? वेळ-व्यवस्थापन भाग-२१ (Time Management Part-21)

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सादर वंदन !

                         मागील अंकात आपण बघितले की परेटोचा ८०/२० चा नियम आपली कार्ययोजना आखण्यास कसा उपयोगी पडतो. आज आपण आपल्या वेळेचा परिणामकारकपणे इष्टतम उपयोग (Optimum Utilization) कसा करावा यावर चिंतन करूया. वेळाच्या इष्टतम उपयोगासाठी आपल्याला खालील साधनांचा उपयोग करायची सवय स्वत:ला लाऊन घ्यायला हवी -

०१) आपली दैनन्दिन कृति-योजना आखणी (Daily Action Planning) : आपल्याला रोज सकाळी प्रातर्विधी    आटपल्यावर सर्वप्रथम १५ मिनिटे आपली दिवसभराची कृति-योजना आखणी करण्यास द्यायला हवी. त्यापूर्वी एक दिवस आधी आपल्याला आपल्या सर्व प्रलंबित कामे (Pending Works), भविष्यात करावयाची कामे, सामाजिक कामे, पारिवारिक उत्तरदायित्वाची कामे सर्वांची एक यादी बनवायला हवी आणि त्यांची विभागणी दोन प्रकारे करावी- ०१) १७ ऑगस्टच्या चिंतनांत विचार केल्याप्रमाणे यादीतील आपल्या सर्व कामांची वैज्ञानिक दृष्टीकोणातून  विभागणी  करावी आणि ०२) यादीतील सर्व कामांच्या पुढे  - अ) आठवड्यात करायची कामे, आ) महिन्याभरात करायची कामे आणि इ) वर्षभरात करायची कामे, आणि ई) वर्षभरानंतर करायची कामे अ/आ/इ/ई अशी मार्किंग / लेबलिंग  करून त्यांचा प्राधान्यक्रम (Priority) ठरवावा. अश्याने दररोज सकाळी आपली दैनंदिन कृति-योजना आखणी करतांना आपली आजची  व आठवड्या भरांत करायची सर्व कामे आपल्या समोर स्पष्ट लिहलेली असल्याने आपल्याला आपली कृति-योजना आखणी करणे फार सोपे जाते व त्यांत आनंद देखील वाटू लागतो. आपली कृति-योजना ठरविण्यासाठी खालील तालिका फार  उपयोगी ठरतात. 

०२ ) आपल्या कामाला ठरविलेल्या वेळेत पूर्ण करणे : आपली दैनंदिन कृति-योजना ठरविताना प्रत्येक कामासाठी अनुमानित अवधी त्या कामासमोर लिहावी जेणेकरून त्या कामांना वेळेवारी पूर्ण करणे शक्य होईल. प्रत्येक काम वेळेवारी पूर्ण करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे ते आपण पुढील अंकात पाहूया.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
      

Saturday, October 1, 2016

"परेटोच्या ८०/२० नियमाद्वारे आपल्या कार्य-योजनेची आखणी" वेळ-व्यवस्थापन भाग-२० ( Time Management Part-20 )

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सादर वंदन !

सर्वांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

जवळ-जवळ महिन्याभराचा कालावधी लोटला, आपल्या व्यस्ततेमुळे मला श्रुंखलेला पुढे नेणे संभव झाले नाही. आज नवरात्रीच्या शुभदिवसापासून वेळ-व्यवस्थापनाची ही श्रुंखला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. 

मागील अंकात  परेटोच्या ८०/२० नियमाद्वारे आपल्या कार्याचे विश्लेषण कसे करावे हे आपण बघितले.  परेटोचा हा ८०/२० या नियमाला समतोल साधण्याचा नियम देखील म्हणतात. कुठल्याही क्षेत्रातील असंतुलनाचे आकलन करण्यास हा नियम फार उपयोगी पडतो आणि या नियमाच्या आधारे विश्लेषण केल्यास हा आपल्या उत्पादकतेत, वेळ-व्यवस्थापनांत,  स्वभावात, विक्रीत सर्व क्षेत्रात आपण पराकोटीचा बदल घडवू शकतो. कसे ते आपण उदाहरणाच्या माध्यमाने आपण मागील अंकात बघितले. आपली कार्य-योजना आखण्यास परेटोचा ८०/२० नियम फार उपयोगी पडतो. मागील अंकात आपण जे उदाहरण बघितले होते त्यास आज पुन्हा एकदा बघूया.


वरील तालिकेत एका कंपनीने २० ग्राहक निवडून त्यांच्याकडून वर्षभरांत मिळालेला एकूण व्यवसाय 
(रु.१,८१,००,०००/-)  दर्शविलेला आहे. ग्राहक क्रमांक १ ते २० पर्यंत प्रत्येकाकडून वर्षभरांत मिळालेला एकूण व्यवसाय क्रमवार दर्शविलेला आहे. यालाच ग्राहक संख्येच्या क्रमात न दर्शविता, मिळालेल्या व्यवसायाच्या आधारावर अधिक ते न्यून या क्रमांत खालील तालिकेमध्ये दर्शविले आहे - 

वरील तालिका क्रमांक २ वरून कळते की आपण आपल्या सर्व ग्राहकांपैकी २०% ग्राहक जे आपल्याला अधिक व्यवसाय देतात , त्यांच्यावर आपण आपले लक्ष अधिक केंद्रित केले पाहिजे. त्या ग्राहकांना विशेष सवलत, विशेष सेवा दिली पाहिजे. त्यांच्याशी आपले संबंध अधिक वाढविण्यात लक्ष दिले पाहिजे , त्यांच्या तक्रारी प्राथामिकतेने दूर केल्या पाहिजे जेणेकरून ते आपल्याला आणखी अधिक व्यवसाय देतील. 

आता या विश्लेषणाचा उपयोग पुढच्या आखणीत कसा करावा हे आपण बघूया -
  • सर्वप्रथम आपण हे ठरवायला हवे की २०% ग्राहकांपासून मिळणारा ८०% व्यवसाय आपल्यासाठी अधिक महत्वपूर्ण आहे की ८०% ग्राहकांकडून मिळणारा २०% व्यवसाय अधिक महत्वपूर्ण आहे.  साहजिक आहे आपण २०% ग्राहकांकडून मिळणाऱ्या ८०% व्यवसाय आपल्यासाठी अधिक महत्वपूर्ण आहे. आपला व्यवसाय वाढविण्यात, आपले टर्न-ओवर वाढविण्यात ह्या २०% ग्राहकांचा सिंहाचा वाटा आहे.  त्या उत्पादांच्या (Products) विक्री वर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे जे उत्पाद हे २०% ग्राहक विकत घेऊन आपल्याला ८०% व्यवसाय देतात.  म्हणून आपल्याला या ग्राहकांसारखे अन्य ग्राहक शोधायला हवे.
  • आपले संपूर्ण लक्ष या २०% ग्राहक आणि त्यांना हवे असलेल्या उत्पादांवर केंद्रित केले पाहिजे. आपल्या या उत्पादांना आणि या ग्राहकांना प्राथमिकता देऊन त्याचे वेळशीर उत्पादन (Timely Manufacturing) करावे. प्रत्येक उत्पाद त्रुटी-रहित (Zero-defect) असावा म्हणून गुणवत्तेला (Quality ) देखील प्राथमिकता आणि महत्व दिले पाहिजे. आपल्याला जर गुणवत्तेसाठी अधिक किंमत जरी मोजावी लागली तरी आपल्या मनांत किंतु-परंतु येता कामा नये कारण गुणवत्तेमुळे ग्राहकाची संतुष्टी मिळते आणि त्याच्याशी आपल्या  नात्यांचे बंध आणखी बळकट होतात ज्याचा दूरगामी परिणाम आपल्यासाठी फार हितकारक ठरतो. गुणवत्तेकडे थोडा काणाडोळा (दुर्लक्ष) करून आपण तात्कालिक फायदा मिळवू शकतो किंवा थोडा पैसा वाचवू शकतो पण हे परिणामी आपल्यासाठी अहितकारक ठरत असते पण गुणवत्तेला आपण प्राथमिकता दिल्यास आपले ग्राहकाबरोबर संबंध एवढे प्रगाढ होतात की बऱ्याचदा आपल्या एकाद्या उत्पदाची किंमत आपल्या प्रतीद्वन्द्वीपेक्षा अधिक जरी असली तरी आपल्या गुणवत्तेच्या आणि संबंधांच्या आधारे ग्राहक किंमतीला दुय्यम दर्ज्याचे महत्व देऊन आपला उत्पाद विकत घेतो.
  • आपण वरील विश्लेषणात बघितले की आपले ८०% ग्राहक आपल्याला केवळ २०% व्यवसाय देतात. मग अश्या ग्राहकांना सोडायला हवे कां ? आपल्या जवळ जर समुचित संसाधनांचा (Resources)अभाव असला तर आपण या २०% व्यवसाय देणाऱ्या ८०% ग्राहकांकडे लक्ष देण्यात वेळ घालविण्यापेक्षा ८०% व्यवसाय देणाऱ्या २०% ग्राहकांवर लक्ष केंद्रित करून आपला व्यवसाय वाढवायला हवा. पण आपल्या जवळ जर समुचित साधन असतील किंवा समुचित साधने मिळविण्यासाठी गुंतवणूक करायची आपली तयारी असल्यास एक स्वतंत्र टीम बनवून त्या टीमला या २०% व्यवसाय देणाऱ्या ८०% ग्राहकांची जवाबदारी स्वतंत्रपणे द्यायला हवी जेणेकरून आपल्याला दोन्ही पक्षाकडून व्यवसाय मिळत राहील.  या २०% व्यवसाय देणाऱ्या ग्राहकांवर आपण आपले कमीत कमी लक्ष आणि कमीत कमी वेळ द्यायला हवा. यातून वाचणारा वेळ आपण आपला व्यवसाय वाढवण्याच्या योजनेच्या आखणीत, ८०% व्यवसाय देणाऱ्या २०%  ग्राहकांसारखे आणखी नवीन ग्राहक विकसित करण्यात गुंतवायला हवा.
         अश्या प्रकारे परेटोचा   ८०/२० नियम आपली कार्य-योजना आखण्यात फार उपयोगी ठरतो.