।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुप्रभातम् !
आत्तापर्यंत आपण राग-व्यवस्थापन या श्रुंखलेत राग किंवा क्रोध यावर विस्तृत चिंतन केले. काल आपण पाहिले की राग अथवा क्रोध हा भौतिक आणि अध्यात्मिक दोन्हीं प्रगती साधण्यात सर्वात मोठा अडथळा आहे पण प्रेम, वैराग्य, विनय आणि विवेक या सद्गुणांच्या माध्यमाने राग किंवा क्रोधावर ताबा मिळवून भौतिक आणि अध्यात्मिक उत्कर्ष साधणे सहज शक्य होते होते.
काही जणांनी मला विचारले की प्रेम, वैराग्य, विनय आणि विवेक हे सद्गुण साधणे कसे शक्य होते ? चराचरांत परमेश्वर पाहून सर्व भूतमात्रांशी प्रेममय वागणूक करणे, काम,क्रोध, मद, मोह,द्वेष,मत्सर या सर्व विकारांपासून मुक्त होणे कसे शक्य होते ? संपूर्ण विश्वच परमेश्वरमय आहे ही दृष्टी विकसित करणे कसे शक्य होते.
या प्रश्नांचे उत्तर प्रश्नातच लपले आहे ? काहीही साधणे किंवा विकसित करणे हे "साधने" ने शक्य होते.
गायन, वादन, नृत्य, अभिनय, चित्रकला, हस्त-शिल्प ईतर कश्यातही कौशल्य मिळवायचे असल्यास "साधना" करावी लागते. साधनेचे वेग-वेगळे प्रकार, वेग-वेगळे मार्ग असतांत जे सर्व आपल्याला 'लक्ष्य' गाठण्यात उपयोगी पडतांत. आपले लक्ष्य गाठण्यासाठी ज्या मार्गावर चालणे आपल्याला सहज जमेल असा साधनामार्ग मार्ग दाखविण्यासाठी आपल्याला "गुरु" ची आवश्यक्ता असते.
"गुरु" हा आपल्या आई प्रमाणे असतो. ज्याप्रमाणे नवजात शिशु पासून तरुणाच्या रूपांत विकसित होई पर्यंत आपली संपूर्ण काळजी 'आई' घेते. लहानपणी आपल्या पोटाला झेपेल असे खाद्य पुरविण्यापासून तरुण वयात येई पर्यंत आपल्याला संगती-दोषामुळे लागणाऱ्या वाईट सवयी, दुर्गुणांपासून आपल्याला जपण्याची जवाबदारी आईची असते त्याचप्रमाणे साधनामार्गात मार्गक्रमण करतांना येणाऱ्या अडचणींपासून, धोक्यांपासून जपण्याची जवाबदारी "गुरु"ची असते.
ज्याप्रमाणे एक शिल्पकार एका दगडावर आघात करून, त्यातील सर्व अवांछनीय तत्वे दूर करून त्याचे एका सुंदर मूर्तीत रुपांतरण करीत असतो त्याच प्रमाणे "गुरु" आपल्यातील काम,क्रोध, मद, मोह,लोभ, ईर्ष्या,द्वेष, मत्सर इत्यादी विकार दूर करून या विकारांमुळे आपल्यातील लपलेले प्रेम, वैराग्य, विनय आणि विवेक यांना समोर आणतो जेणेकरून आपल्या व्यक्तित्वाचे एका 'शिल्पात' रूपांतरण होते.
आपल्या व्यक्तित्वाचे 'शिल्पांत' रूपांतरण करून घ्यायचे असल्यास स्वत:ला एका दगडाप्रमाणे 'गुरु'च्या हवाले करून साधनामार्गातील सर्व आघात सहन करण्यात आनंद मानायला हवा.
साधनामार्गातील आघात हे आपल्यावर होत नसून आपल्याला चिकटलेल्या विकारांवर होत असतात म्हणून पूर्ण शरणागती पत्करून आपले सर्वस्व गुरु ला अर्पण करायला हवे.
गुरु आणि साधनामार्ग हे दोनही आपल्याला निवडायचे नसते. आपल्याला उत्कर्ष साधण्याची तहान लागल्यावर केवळ ईश्वराला प्रार्थना करावी लागते, गुरु स्वत: आपली तहान भागविण्यासाठी आपल्या जीवनांत येतात आणि आपल्याला योग्य वाट दाखवतात.
स्व-प्रयत्नाने विकारांना जाणून त्यांना दूर करण्याची ईच्छा मनांत जागृत होणे आणि त्यासाठी प्रयत्न प्रारंभ करणे हे 'तहान' लागण्याचे लक्षण आहे आणि ज्या व्यक्तीला ही तहान लागते त्याच्या जवळ गुरु त्याचप्रमाणे पोचतात ज्याप्रमाणे एक शिल्पकार असंख्य दगडातून एखादा दगड 'शिल्प' तयार करण्यासाठी निवडण्यास पोचतो. म्हणून आपल्यातील काम,क्रोध, मद, मोह,लोभ,ईर्ष्या,द्वेष आणि मत्सर यांना ओळखून त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न सुरु केल्यास भौतिक आणि अध्यात्मिक प्रगतीच्या पथावर मार्गक्रमण सुरु होते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

No comments:
Post a Comment