Total Pageviews

Sunday, August 21, 2016

"स्वयं-व्यवस्थापनाचे ४ आधार स्तंभ" वेळ-व्यवस्थापन भाग-१५ (Time Management Part-15)


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सुप्रभातम्  !

                     यशस्वी व्यक्ती चौकोन २ मधील कामे करतात जी सहा महत्वाच्या निकषांवर (Criteria) आधारित असतात, या साही निकषांवर आपण दोन दिवस चिंतन केले. आज आपण वेळ-व्यवस्थापनाचा पाया असणाऱ्या 'स्वयं व्यवस्थापन' या विषयावर चिंतन करूया. 

                     उत्तम वेळ-व्यवस्थापनासाठी  चौकोन २ च्या कामांची आखणी करण्यापूर्वी चार कळीच्या मुद्यांवर काम करणे अतिशय गरजेचे आहे-  


  • महत्वाच्या भूमिका निवडणे : उत्तम वेळ-व्यवस्थापनासाठी सर्वात महत्वाचे आणि पहिले पाऊल म्हणजे आपल्या महत्वाच्या भूमिकांची निवड करणे. या जगात वावरतांना आपण वेग-वेगळ्या भूमिकांचे निर्वहन करतो आणि हे निर्वहन करणे जितके गरजेचे आहे त्याहून अधिक गरजेचे या 'भूमिकांचा योग्य आणि उत्तमरीत्या निर्वहन करणे' आहे. आपण दोन दिवसांपासून चिंतन करीत आहोत की आई/वडील, पुत्र/पुत्री, पती/पत्नी,आजी/आजोबा, नातू,पणतू, मावशी, जावई/सून, सासरा/सासू,भाऊ/बहीण, काका/काऊ, मामा/मामी, आत्या/अतोबा, मित्र/मैत्रीण, मालक/नोकर, व्यावसायिक भागीदा, समाज सेवक,  ईतर सर्व भूमिकांचे निर्वहन आपण करीत असतो आणि या सर्व भूमिकांमध्ये संतुलन असणे फार गरजेचे आहे.  आपण यातील काही महत्वाच्या भूमिकांची निवड करायला हवी ज्यांच्यात आपल्याला नियमितपणे वेळ आणि शक्ती गुंतवावीशी मनापासून वाटत असते. या निवडक भूमिकांमध्ये पुढील आठवड्यात कुठे-कुठे आपला वेळ, शक्ती, पैसा जाणार आहे ते व्यवस्थितपणे लिहून काढायला हवे आणि हे करतांना आपण  "स्वत:" या भूमिकेला कदापि विसरू नये कारण त्याला विशेष महत्व देण्याची गरज आहे. स्वत:वर नियमित रूपाने वेळ देणे सर्वात महत्वाचे आहे. स्वत:चे आरोग्य, स्वत:चे मनोरंजन, स्वत:च्या वैयक्तिक गरजा, स्वत:चा वैयक्तिक विकास आणि स्वत:चा अध्यात्मिक उत्कर्ष या सर्वांसाठी नियमित वेळ आपल्या वेळा-पत्रकामध्ये असणे फार गरजेचे आहे. भूमिकांची निवड करतांना केवळ पुढील आठवड्याचा विचार करून भूमिका निवडाव्या. प्रारंभी अगदी मोजक्या भूमिकांची निवड करायला हवी कारण भूमिकांची संख्या अधिक निवडण्यापेक्षा एका आठवड्यात मोजक्या ३-४ भूमिका निवडून त्यामध्ये आपला किती वेळ, शक्ती आणि पैसा जाणार आहे याचे आकलन करावे आणि मग पुढील आठवड्यात १-२ संख्या वाढवावी जेणेकरून हळू-हळू सर्व भूमिकांचे संतुलन साधणे सोपे होत जाईल. एकदम ८-१० भूमिकांची निवड केली तर आपली गफलत होईल आणि अपेक्षित परिणाम मिळणार नाही. 

  • महत्वाच्या भूमिकांसाठी उद्दीष्ट ठरविणे :  भूमिकांची निवड झाल्यावर पुढचे पाऊल म्हणजे पुढील आठवड्यात आपण निवडलेल्या महत्वाच्या सर्व भूमिकांसाठी आपण साध्य करावे असे एक किंवा दोन उद्दिष्टे लिहावी आणि या सर्व उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ, प्रयत्न आणि आवश्यक पैसा याची व्यवस्थित नोंद एका वहीत  करावी. निवडलेली  प्रत्येक भूमिका आणि त्या भूमिकेशी संबंधित उद्दिष्टे यांचा अतिशय शांतपणे विचार करून ती उद्दिष्टे मिळविण्यासाठी आपल्या योजनेची आखणी करावी. जशी-जशी आपली उद्दिष्टे पूर्ण होत जातील तशी-तशी आपली नियोजन क्षमता आणि आत्मविश्वास वाढत जाईल.
  • वैयक्तिक आणि योग्य वेळापत्रकाची आखणी : आपले वेळापत्रक हे वैयक्तिक आणि आपल्यासाठी योग्य असावे यावर आपण आधी विचार केलेला आहे. आपल्या महत्वाच्या भूमिकांची निवड, त्यांच्याशी संबंधित पुढील आठवड्यात साध्य करावीशी वाटणारी उद्दिष्टे आणि त्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यास आवश्यक वेळ, प्रयत्न आणि पैसा याची व्यवस्थित आखणी झाली की त्याची आपल्या पुढील आठवड्याच्या वेळापत्रकात "योग्य ठिकाणी" नोंद करावी.  "योग्य ठिकाणी' चा अर्थ आहे आपल्याला अनुकूल दिवशी, अनुकूल कालखंडात त्या उद्दिष्टाची नोंद करावी. उदाहरणार्थ आपण  'जीवनसाथी' भूमिकेसाठी आपल्या पत्नी/पती बरोबर सिनेमाला किंवा नाटकाला जायचे  ठरविले पण दिवस आणि वेळ ठरविताना जर आपल्या जीवनसाथीला ठराविक दिवशी ठराविक वेळेस जाणे शक्य आहे की नाही?  त्याची/तिची धावपळ तर नाही होणार? तो/ती आपल्या ख़ुशीसाठी आपल्या बरोबर येईल पण तो खरच त्या क्षणांचा आनंद घेऊ शकेल कां? की त्याचे/तिचे लक्ष सिनेमात किंवा नाटकात नसून ऑफिसच्या/घराच्या महत्वाच्या कामात असेल?  या सर्वांचा  विचार नाही केला  तर हा खटाटोप  केवळ एक औपचारिकता म्हणून राहून जातो , अपेक्षित उद्दिष्ट साधता येत नाही. म्हणून एखाद्या भूमिकेशी संबंधित उद्दिष्ट पुढील आठवड्यात साधणे जर अशक्य वाटत असले तर, त्या उद्दिष्टाला एक आठवडा पुढे ढकलणे पण योग्य आहे पण जर ठराविक उद्दिष्टे ठराविक वेळेत साधता नाही आली तर आपले 'मनोबल' कमी होते.आखणीच्या सुरुवातीला मनोबल कमी होण्या पेक्षा मनोबल वाढणे याच्याकडे लक्ष असावे आणि यासाठी अगदी सहज-साध्य होणाऱ्या उद्दिष्टांचाच आपल्या वेळा-पत्रकांत समावेश करायला हवा.
  • वेळापत्रकाचे नियमित अवलोकन : वेळापत्रकाची आखणी झाल्यावर रोज दिवसातून तीनदा तरी आपल्या वेळापत्रकाचा गंभीरपणे आढावा घेतला पाहिजे. वेळापत्रक एकदा ठरविले की ते वेळापत्रक म्हणजे "दगडावरची रेषा" होता कामा नये. आपण कालच्या चिंतनांत पहिले की आपल्या वेळा-पत्रकात लवचिकता असणे फार गरजेचे आहे. उद्भवलेल्या अनपेक्षित प्रसंगांच्या अनुरूप वेळा-पत्रकात फेरबदल करणे अपेक्षित वाटत असले तर ते आवर्जून करायला हवे. वेळा-पत्रकात फेरबदल हे नियमित अवलोकनानेच शक्य आहे आणि वेळापत्रकाचे नियमित अवलोकन करीत राहिल्यामुळे ते आपल्या अवचेतन मनांत 'स्टोर' होत जाते आणि कुठलेही काम वेळे-वारी पूर्ण करण्यासाठी आपले अवचेतन मन आपली मदत करीत असते. 
    वरील चारही मुद्दे स्वयं-व्यवस्थापनाचे आधार स्तंभ आहेत आणि या चारही स्तंभांचा निर्माण करतांना त्यांच्या बळकटपणावर, मजबुतीवर विशेष लक्ष दिल्यास वेळ-व्यवस्थापन करणे सहज शक्य होते.

     
    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

No comments:

Post a Comment