Total Pageviews

Wednesday, August 31, 2016

"परेटोच्या ८०/२० नियमाच्या आधारे वेळाचे विश्लेषण" वेळ-व्यवस्थापन भाग १८ (Time Management Part-18)

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सुप्रभातम्  !

मागील एक आठवडा वेळ-व्यवस्थापन विषयावर चिंतन करणे जमले नाही त्यासाठी क्षमस्व !

मागील लेखांकात आपण
 स्वयं-व्यवस्थापनाचे सर्वात महत्वाचे कार्य आपल्या "वेळाचे विश्लेषण" (Time Analysis) यावर चिंतन केले  कारण विश्लेषण केल्याशिवाय आपल्याला आपली वर्तमान स्थिती कळणार नाही आणि ती कळल्याशिवाय पुढची आखणी केली तरी त्यात यश मिळत नाही.

आपण आपले दैनंदिन कामांचे विश्लेषण मागील लेखाप्रमाणे आवश्यक
'डेटा' गोळा करून केले तर आपल्याला कळते की आपण आपल्या वेळचा  किती भाग  'उत्पादक' कामांना दिला आणि किती भाग 'अनुत्पादक' कामांमध्ये व्यर्थ घालविला.

आज आपण
"वेळाचे विश्लेषण" (Time Analysis) याची पुढील पायरी "परेटोच्या ८०/२० सिद्धांतानुसार विश्लेषण" चा आढावा घेऊया.

विल्फ्रेडो परेटो हे इटलीचे एक 
अभियंता, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकीय शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी होते. त्यांनी अर्थशास्त्र,  विज्ञान आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या अध्ययनाच्या आधारावर हा शोध लावला की इटालीचा ८०% भूभाग हा २०% लोकांच्या मालकीचा होता आणि शेष २०% भूभाग ८०%  लोकांच्या मालकीचा होता.  त्यांनी हे अनुभवले की ८०/२० हा अनुपात वेळ, विक्री ईतर अन्य क्षेत्रात देखील  लागू पडतो. त्यांनी या सिद्धांताला 'परेटो सिद्धांत' असे नाव दिले व हा सिद्धांत जगभरांत '८०/२० नियम' (80/20 Rule) या नावाने प्रसिद्ध झाला. हा सिद्धांत प्रत्येक क्षेत्रांत समतोल साधण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतो म्हणून याला "समतोल साधण्याचा नियम" (Balancing Act) देखील म्हणतात. असंतुलनाचे आकलन करण्यास हा नियम आपल्याला फार उपयोगी पडतो आणि या नियमाच्या आधारे आत्म-विश्लेषण केल्याने आपण स्वत:च्या स्वभावात, उत्पादकतेत, वेळ-व्यवस्थापानांत पराकोटीचा बदल घडवून आणू शकतो.  


सोप्या भाषेत या सिद्धांताची किंवा मांडायचे असले तर आपण असे म्हणू शकतो की "आपण केलेल्या एकूण प्रयत्नांपैकी २०% प्रयत्नांमुळे आपल्याला  ८०% परिणाम मिळतात अर्थात आपले २०% प्रयत्न आपल्या ८०% परिणामांसाठी कारणीभूत ठरतात" 


८०/२० नियम हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे कारण या नियमाच्या आधारावर विश्लेषण केल्याने आपल्याला कळते की आपण केलेली ८०% कामे अनुपयोगी, अनुत्पादक, व्यर्थ होती. आपण व्यतीत केलेला ८०% वेळ हा व्यर्थ घालविला आहे असे कळते आणि मग आपली उत्पादकतेकडे, उपयोगीतेकडे, सार्थकतेकडे वाटचाल सुरु होते.

उद्या आपण याच नियमावर विस्तृत चिंतन करूया.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

Wednesday, August 24, 2016

आपल्या वेळेचे विश्लेषण कसे करावे ? वेळ-व्यवस्थापन भाग-१७ (Time Management Part-17)


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सुप्रभातम्  !

           काल आपण स्वयं-व्यवस्थापनामुळे आपल्याला वेळ-व्यवस्थापन कसे साध्य होते यावर विचार केला, आज आपण स्वयं-व्यवस्थापनाचे सर्वात महत्वाचे कार्य आपल्या "वेळाचे विश्लेषण" (Time Analysis) यावर चिंतन करूया कारण विश्लेषण केल्याशिवाय आपल्याला आपली वर्तमान स्थिती कळणार नाही आणि ती कळल्याशिवाय पुढची आखणी केली तरी त्यात यश मिळत नाही.

           आपल्या वेळाचे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला कच्चा माल अर्थात आपण आपला वेळ कुठे आणि कसा घालवतो आहे याचा 'डेटा' असणे अतिशय आवश्यक आहे. हा 'डेटा' गोळा करण्यासाठी आपण आपण सकाळी उठल्यापासून  रात्री झोपण्यापर्यंतच्या आपल्या वेळेची विभागणी ८ ते १० कालखंडात करावी. उदाहरणार्थ आपण सकाळी ६ वाजता उठून रात्री १० पर्यंत झोपत आहोत. सकाळी ८ ते रात्री १० पर्यंतच्या १६ तासांना दोन-दोन तासांच्या ८ कालखंडात वाटावे आणि प्रत्येक कालखंडापुढे तीन स्तंभ बनवावे. एका स्तंभात आपण त्या कालखंडाचा किती भाग 'उत्पादक' (Productive) कामांमध्ये घालविला, दुसऱ्या स्तंभात किती भाग 'अनुत्पादक' (Non-Productive) कामांमध्ये घालविला आणि तिसऱ्या स्तंभात आपला त्यावर आपली 'टीपणे' (Remarks) लिहायला हवे.  हे एक आठवड्या पर्यंत दररोज न विसरता सचोटीने लिहावे. सात दिवसात आपल्याला कळून येईल आपण आपल्या मौल्यवान वेळेचा किती भाग उत्पादक कामांमध्ये आणि किती भाग अनुत्पादक कामांमध्ये घालवितो आहे. मग हळू-हळू अनुत्पादक कामांमध्ये व्यतीत होत असणारा आपला वेळ कमी करायचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्याला  उत्पादक कामांसाठी वेळेची कमी पडणार नाही.

एक महत्वाची नोंद येथे करणे गरजेचे आहे की प्रत्येक व्यक्तीची 'उत्पादक' आणि 'अनुत्पादक' कामांची परिभाषा वेगळी असते. एखाद्या व्यक्तीसाठी अर्थार्जन अधिक महत्वाचे असते तर दुसऱ्यासाठी 'नाती जपणे' अधिक महत्वाचे असते, तर कुणाला समाजकार्याची आवड असल्यामुळे सामाजिक कार्यात गुंतलेला वेळ त्याला उत्पादक वाटतो. म्हणून उत्पादक आणि अनुत्पादक कामांची नोंद करतांना आपल्या 'गरजा' आणि 'रुची' दोन्हींला ध्यानात घेऊन ही नोंद करावी. 
अश्याप्रकारे तालिका बनवून त्यात नोंद करून मग उपलब्ध झालेल्या 'डेटा'चे विश्लेषण करावे.   



।। जय जय रघुवीर समर्थ ।।





Tuesday, August 23, 2016

'स्वयं-व्यवस्थापनामुळे आपल्याला वेळ-व्यवस्थापन कसे साध्य होते?' वेळ-व्यवस्थापन भाग-१६ (Time Management Part-16)


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सुप्रभातम्  !

काही अपरिहार्य अडचणींमुळे काल चिंतन संभव झाले नाही त्यासाठी क्षमस्व ! 

                       परवा आपण वेळ-व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक 'स्वयं-व्यवस्थापनाचे चार आधार स्तंभ' या विषयावर चिंतन केले. आज 'स्वयं-व्यवस्थापनामुळे आपल्याला वेळ-व्यवस्थापन कसे साध्य होते' यावर चिंतन करूया.

  • स्वयं-व्यवस्थापन हे तत्व-केंद्रित असल्याने अतिशय महत्वाचे आणि परिणामकारक देखील आहे. स्वयं-व्यवस्थापन करणारा व्यक्ती स्वत: ती तत्वे जगत असल्याने चौकोन २ च्या कामांबद्दल केवळ निव्वळ बडबड करण्यापेक्षा ती कामे करून आपला वेळ वाचवीत असतो. त्याला चौकोन २ च्या कामांचे महत्व कळलेले असते.
  • स्वयं-व्यवस्थापन हे आपल्या विवेकाद्वारे संचालित असते. आपल्या मनांत खोलवर मुरलेल्या मूल्यांशी सुसंगत असल्यामुळे आपल्या नियोजन-क्षमतेचा सर्वोत्कृष्ट उपयोग करून आपल्या संपूर्ण आयुष्याची आखणी करून योग्य मार्ग निवडण्याची संधी आणि स्फूर्ती देते .

    हे करतांना बऱ्याचदा आपल्या मूल्यांना प्राधान्य देत गरज पडल्यास आपले वेळा-पत्रक बाजूला ठेवण्याचे स्वातंत्र्य देऊन आपल्याला मूल्याधारित कामे आधी करण्यास प्रवृत्त करते.

  • स्वयं-व्यवस्थापन आपल्याला लघु आणि दीर्घ पल्ल्यांची उद्दिष्टे ठरविण्यासाठी प्रवृत्त आणि मदत करते . आपली उद्दिष्टे ठरविल्यामुळे आपल्याला वारं-वार त्या मूल्यांची आठवण करून देत आपल्या जगण्याला हेतू आणि योग्य दिशा देते.

  • स्वयं-व्यवस्थापनामुळे आपल्या स्वत:च्या भूमिका ठरविण्यास मदत मिळते आणि प्रत्येक भूमिकेसाठी वेळ काढून तिच्याशी संबंधित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो जेणेकरून आपल्याला आपल्या सर्व महत्वाच्या भूमिकांमध्ये योग्य समतोल राखता येतो, प्रत्येक भूमिकेबरोबर न्याय करता येतो, कुठल्याही भूमिकेकडे दुर्लक्ष किंवा कुठल्याही भूमिकेची अवहेलना आपल्या हातून होत नाही.

  • स्वयं-व्यवस्थापनामुळे  अव्यवस्थितपणापासून आपली सुटका होते. आपण एक व्यवस्थित जीवन जगू लागतो. आपले केवळ दैनंदिन कार्यच नव्हे तर संपूर्ण आठवडाभराची कामे, कर्तव्य, वैयक्तिक, पारिवारिक , व्यावसायिक आणि सामाजिक दायीत्वे असे सर्व काही आपल्याला अगदी सुस्पष्ट दिसत असल्याने सर्व काही साध्य करण्याची ईच्छा मनांत जागृत होते आणि सर्व काही साध्य करणे देखील सोपे होते.


                   स्वयं-व्यवस्थापनाने आपला व्यावहारिक धागा आणि नाते-संबंध दोन्हीं मजबूत होतात जेणेकरून आपण 'हार्ड वर्क' या संकल्पनेतून 'हार्ड आणि स्मार्ट वर्क दोन्हींचा समतोल राखणे' या संकल्पनेकडे झेप घेतो ज्याच्या परिणामस्वरूप आपल्याला आपले वेळ-व्यवस्थापन आणि यश-संपादन दोन्ही अगदी सहजपणे साध्य होतात.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Sunday, August 21, 2016

"स्वयं-व्यवस्थापनाचे ४ आधार स्तंभ" वेळ-व्यवस्थापन भाग-१५ (Time Management Part-15)


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सुप्रभातम्  !

                     यशस्वी व्यक्ती चौकोन २ मधील कामे करतात जी सहा महत्वाच्या निकषांवर (Criteria) आधारित असतात, या साही निकषांवर आपण दोन दिवस चिंतन केले. आज आपण वेळ-व्यवस्थापनाचा पाया असणाऱ्या 'स्वयं व्यवस्थापन' या विषयावर चिंतन करूया. 

                     उत्तम वेळ-व्यवस्थापनासाठी  चौकोन २ च्या कामांची आखणी करण्यापूर्वी चार कळीच्या मुद्यांवर काम करणे अतिशय गरजेचे आहे-  


  • महत्वाच्या भूमिका निवडणे : उत्तम वेळ-व्यवस्थापनासाठी सर्वात महत्वाचे आणि पहिले पाऊल म्हणजे आपल्या महत्वाच्या भूमिकांची निवड करणे. या जगात वावरतांना आपण वेग-वेगळ्या भूमिकांचे निर्वहन करतो आणि हे निर्वहन करणे जितके गरजेचे आहे त्याहून अधिक गरजेचे या 'भूमिकांचा योग्य आणि उत्तमरीत्या निर्वहन करणे' आहे. आपण दोन दिवसांपासून चिंतन करीत आहोत की आई/वडील, पुत्र/पुत्री, पती/पत्नी,आजी/आजोबा, नातू,पणतू, मावशी, जावई/सून, सासरा/सासू,भाऊ/बहीण, काका/काऊ, मामा/मामी, आत्या/अतोबा, मित्र/मैत्रीण, मालक/नोकर, व्यावसायिक भागीदा, समाज सेवक,  ईतर सर्व भूमिकांचे निर्वहन आपण करीत असतो आणि या सर्व भूमिकांमध्ये संतुलन असणे फार गरजेचे आहे.  आपण यातील काही महत्वाच्या भूमिकांची निवड करायला हवी ज्यांच्यात आपल्याला नियमितपणे वेळ आणि शक्ती गुंतवावीशी मनापासून वाटत असते. या निवडक भूमिकांमध्ये पुढील आठवड्यात कुठे-कुठे आपला वेळ, शक्ती, पैसा जाणार आहे ते व्यवस्थितपणे लिहून काढायला हवे आणि हे करतांना आपण  "स्वत:" या भूमिकेला कदापि विसरू नये कारण त्याला विशेष महत्व देण्याची गरज आहे. स्वत:वर नियमित रूपाने वेळ देणे सर्वात महत्वाचे आहे. स्वत:चे आरोग्य, स्वत:चे मनोरंजन, स्वत:च्या वैयक्तिक गरजा, स्वत:चा वैयक्तिक विकास आणि स्वत:चा अध्यात्मिक उत्कर्ष या सर्वांसाठी नियमित वेळ आपल्या वेळा-पत्रकामध्ये असणे फार गरजेचे आहे. भूमिकांची निवड करतांना केवळ पुढील आठवड्याचा विचार करून भूमिका निवडाव्या. प्रारंभी अगदी मोजक्या भूमिकांची निवड करायला हवी कारण भूमिकांची संख्या अधिक निवडण्यापेक्षा एका आठवड्यात मोजक्या ३-४ भूमिका निवडून त्यामध्ये आपला किती वेळ, शक्ती आणि पैसा जाणार आहे याचे आकलन करावे आणि मग पुढील आठवड्यात १-२ संख्या वाढवावी जेणेकरून हळू-हळू सर्व भूमिकांचे संतुलन साधणे सोपे होत जाईल. एकदम ८-१० भूमिकांची निवड केली तर आपली गफलत होईल आणि अपेक्षित परिणाम मिळणार नाही. 

  • महत्वाच्या भूमिकांसाठी उद्दीष्ट ठरविणे :  भूमिकांची निवड झाल्यावर पुढचे पाऊल म्हणजे पुढील आठवड्यात आपण निवडलेल्या महत्वाच्या सर्व भूमिकांसाठी आपण साध्य करावे असे एक किंवा दोन उद्दिष्टे लिहावी आणि या सर्व उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ, प्रयत्न आणि आवश्यक पैसा याची व्यवस्थित नोंद एका वहीत  करावी. निवडलेली  प्रत्येक भूमिका आणि त्या भूमिकेशी संबंधित उद्दिष्टे यांचा अतिशय शांतपणे विचार करून ती उद्दिष्टे मिळविण्यासाठी आपल्या योजनेची आखणी करावी. जशी-जशी आपली उद्दिष्टे पूर्ण होत जातील तशी-तशी आपली नियोजन क्षमता आणि आत्मविश्वास वाढत जाईल.
  • वैयक्तिक आणि योग्य वेळापत्रकाची आखणी : आपले वेळापत्रक हे वैयक्तिक आणि आपल्यासाठी योग्य असावे यावर आपण आधी विचार केलेला आहे. आपल्या महत्वाच्या भूमिकांची निवड, त्यांच्याशी संबंधित पुढील आठवड्यात साध्य करावीशी वाटणारी उद्दिष्टे आणि त्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यास आवश्यक वेळ, प्रयत्न आणि पैसा याची व्यवस्थित आखणी झाली की त्याची आपल्या पुढील आठवड्याच्या वेळापत्रकात "योग्य ठिकाणी" नोंद करावी.  "योग्य ठिकाणी' चा अर्थ आहे आपल्याला अनुकूल दिवशी, अनुकूल कालखंडात त्या उद्दिष्टाची नोंद करावी. उदाहरणार्थ आपण  'जीवनसाथी' भूमिकेसाठी आपल्या पत्नी/पती बरोबर सिनेमाला किंवा नाटकाला जायचे  ठरविले पण दिवस आणि वेळ ठरविताना जर आपल्या जीवनसाथीला ठराविक दिवशी ठराविक वेळेस जाणे शक्य आहे की नाही?  त्याची/तिची धावपळ तर नाही होणार? तो/ती आपल्या ख़ुशीसाठी आपल्या बरोबर येईल पण तो खरच त्या क्षणांचा आनंद घेऊ शकेल कां? की त्याचे/तिचे लक्ष सिनेमात किंवा नाटकात नसून ऑफिसच्या/घराच्या महत्वाच्या कामात असेल?  या सर्वांचा  विचार नाही केला  तर हा खटाटोप  केवळ एक औपचारिकता म्हणून राहून जातो , अपेक्षित उद्दिष्ट साधता येत नाही. म्हणून एखाद्या भूमिकेशी संबंधित उद्दिष्ट पुढील आठवड्यात साधणे जर अशक्य वाटत असले तर, त्या उद्दिष्टाला एक आठवडा पुढे ढकलणे पण योग्य आहे पण जर ठराविक उद्दिष्टे ठराविक वेळेत साधता नाही आली तर आपले 'मनोबल' कमी होते.आखणीच्या सुरुवातीला मनोबल कमी होण्या पेक्षा मनोबल वाढणे याच्याकडे लक्ष असावे आणि यासाठी अगदी सहज-साध्य होणाऱ्या उद्दिष्टांचाच आपल्या वेळा-पत्रकांत समावेश करायला हवा.
  • वेळापत्रकाचे नियमित अवलोकन : वेळापत्रकाची आखणी झाल्यावर रोज दिवसातून तीनदा तरी आपल्या वेळापत्रकाचा गंभीरपणे आढावा घेतला पाहिजे. वेळापत्रक एकदा ठरविले की ते वेळापत्रक म्हणजे "दगडावरची रेषा" होता कामा नये. आपण कालच्या चिंतनांत पहिले की आपल्या वेळा-पत्रकात लवचिकता असणे फार गरजेचे आहे. उद्भवलेल्या अनपेक्षित प्रसंगांच्या अनुरूप वेळा-पत्रकात फेरबदल करणे अपेक्षित वाटत असले तर ते आवर्जून करायला हवे. वेळा-पत्रकात फेरबदल हे नियमित अवलोकनानेच शक्य आहे आणि वेळापत्रकाचे नियमित अवलोकन करीत राहिल्यामुळे ते आपल्या अवचेतन मनांत 'स्टोर' होत जाते आणि कुठलेही काम वेळे-वारी पूर्ण करण्यासाठी आपले अवचेतन मन आपली मदत करीत असते. 
    वरील चारही मुद्दे स्वयं-व्यवस्थापनाचे आधार स्तंभ आहेत आणि या चारही स्तंभांचा निर्माण करतांना त्यांच्या बळकटपणावर, मजबुतीवर विशेष लक्ष दिल्यास वेळ-व्यवस्थापन करणे सहज शक्य होते.

     
    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Saturday, August 20, 2016

"यशस्वी व्यक्तीच्या द्वारे निवडलेली कामे" वेळ-व्यवस्थापन भाग-१४ (Time Management Part-14)




।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

                        यशस्वी व्यक्ती चौकोन २ मधील कामे करतात जी सहा महत्वाच्या निकषांवर (Criteria) आधारित असतात, ज्यापैकी सुसंगतपणा आणि संतुलन या दोन निकषांवर आपण काल चिंतन केले. आपण पाहिले की आपल्या जीवनाचे ध्येय आणि आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी यात सुसंगतपणा असणे फार गरजेचे आहे तसेच जीवन जगताना आपण आपल्या प्रत्येक भूमिकेचे निर्वहन योग्यपणे केले पाहिजे. एका स्त्रीचा नवरा म्हणून वावरताना आपल्याला मुलगा,भाऊ, वडील, काका,मामा, दीर, मित्र या सर्व भूमिकांबरोबर देखील न्याय केलाच पाहिजे, सर्व भूमिकांमध्ये संतुलन राखल्याने मन:स्ताप कमी होतात, संबंध वाढीस लागतात आणि आपल्याला गरज पडल्यावर बरेच हात मदतीला पुढे येतात. आपले यश-संपादन हे केवळ आपल्या कर्तृत्वावर अवलंबून नसून असंख्य लोकांच्या सहाय्यावर, सद्भावनांवर अवलंबून असते.  पुढील निकष आहेत -

  • लक्ष्य केंद्रितता -  लक्ष्याभिमुख (Goal Oriented ) होण्यासाठी आपल्या नजरेस आपले लक्ष्य सुस्पष्ट दिसणे अतिशय गरजेचे आहे. अर्जुनाला ज्याप्रमाणे संपूर्ण मासोळी किंवा आजू-बाजूचे दृश्य न दिसून केवळ मासोळीचा 'डोळा' दिसत होता, त्याच प्रमाणे आपल्यालाही केवळ आपले लक्ष्य सुस्पष्ट दिसणे अतिशय गरजेचे आहे. लक्ष्य केंद्रितता मिळविण्यासाठी आपल्याला अश्या साधनाची गरज असते जे आपल्याला अधिकाधिक वेळ चौकोन २ च्या कामांमध्ये द्यायसाठी प्रेरित करतील, मदत करतील जेणेकरून आपल्याला आपले प्राधान्यक्रम ठरविण्यास, आणि-बाणीच्या कामांना निस्तरण्यात वेळ घालविण्यापेक्षा आपला वेळ प्रतिबंधात्मक कृती (Preventive Action ) करण्यास मदत होईल. यासाठी सर्वाधिक उपयुक्त साधन "साप्ताहिक नियोजन" करणे आहे. दैनंदिन प्राधान्यक्रम ठरविणे म्हणजे साप्ताहिक नियोजनाची केवळ पूर्व तयारी असते. एखादी 'डिश' बनवताना आपण त्यासाठी आवश्यक सामग्री एकत्र करून त्या डिशची पूर्व-तयारी करतो  आणि मग त्या डिशच्या पाककृती प्रमाणे ती तयार करतो तसेच सर्व कामांची यादी बनवून  दैनंदिन प्राधान्यक्रम ठरविणे म्हणजे पूर्व तयारी आणि साप्ताहिक नियोजन म्हणजे पाककृती प्रमाणे डिश तयार करणे होय. 
             दैनंदिन नियोजनापेक्षा साप्ताहिक नियोजनाद्वारे आपल्या कार्यांमध्ये आणि भूमिकांमध्ये योग्य समतोल राखणे शक्य होते आणि उत्तम अपेक्षित परिणाम मिळतात. आपण आपल्या साप्ताहिक नियोजनामध्ये प्रत्येक भूमिकेशी संबंधित उद्दिष्ट ठरवून ते साध्य करू शकतो कारण साप्ताहिक नियोजनात एकाद्या कामाला स्थान मिळाले की ते विसरणे संभव नाही. उदाहरणार्थ आपला मामा ज्याने लहानपणी आपले खूब लाड पुरविले, कौतुक केले , तो फार आजारी आहे असे कळल्यावर आपले मन उद्विग्न (उदास) होते पण पुढील २-३  दिवस आपण फार व्यस्त असल्यामुळे आपल्याला पुढील २-३ दिवस त्याची तब्यत पाहायला जाणे शक्य नाही. पुढे २-३ दिवसांनी आपल्या उद्विग्नतेची तीव्रता कमी होते आणि आपण अन्य कामांना प्राथमिकता देऊन तब्यत पाहायला जाणे आणखी १-२ दिवस पुढे ढकलतो आणि असे करत आपण ते पार विसरून जातो आणि एक दिवस मामा वारल्याची दु:खद बातमी आपल्याला कळते आणि आपल्याकडे  शिवाय पश्चात्तापाच्या आणखी काही नाही राहात. अश्यावेळेस आपण जर मामाला भेटायला जाण्याला आपल्या प्राधान्य क्रमात महत्वाचा क्रम देऊन आठवड्याच्या शेवटल्या दिवशी अर्थात रजेच्या दिवशीच्या कार्यांमध्ये प्राथमिक स्थान दिले असते तर ते सहज शक्य झाले असते. वेळ कधीही आणि कुणासाठीही थांबत नाही म्हणून आपल्या स्मृतीवर अवलंबून न राहता जर प्रत्येक कामाला आपल्या साप्ताहिक वेळा-पत्रकात स्थान दिला तर कुठलेही कार्य साध्य/पूर्ण नाही झाले तरी त्याची नोंद आपल्या वेळा-पत्रकांत असल्यामुळे आपण ते विसरत नाही आणि पुढील आठवड्याचे वेळा-पत्रक ठरविताना त्या 
    अपूर्ण/न झालेल्या कामाची नोंद त्यात करतो आणि ते कार्य एक-दोन आठवडे जरी लांबले तरी ते पूर्ण होते.  केवळ लक्ष्य ठरवून ते साध्य होत नाही त्यासाठी लक्ष्याभिमुख होऊन कृती करणे गरजेचे आहे. साप्ताहिक नियोजन केल्याने आवश्यक लक्ष्य-केंद्रितता मिळवून आपण लक्ष्याभिमुख होतो जेणेकरून यश-संपादन करणे सहज शक्य होते.

  • लोक-परिमाण : यशस्वी व्यक्ती लोक-व्यवहाराला वेळा-पत्रकाहून अधिक महत्व आणि प्राथमिकता देतात. यश-सम्पादनांत वेळेच्या बाबतीत कार्यक्षम (Efficient)  असण्यापेक्षा लोकांशी व्यवहाराच्या बाबतीत कार्यक्षम असणे अधिक उपयोगी असते कारण चौकोन २ च्या कामांमध्ये तत्वांना प्राथमिकता आणि वेळ-पत्रकाला दुय्यमत्व मिळते. साप्ताहिक वेळा-पत्राची आखणी एक साधन आहे पण साध्य नाही. केवळ वेळा-पत्रकात नोंद असलेली कामे वेळे-वारी केल्याने जे साध्य होत नाही ते बऱ्याचदा वेळा-पत्रक एकीकडे ठेऊन त्यात नोंद नसलेले पण "तत्वाधिष्ठीत" काम प्राथामिकतेने केल्याने सहज साध्य होते. उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या महत्वाच्या कामाने आज दोन दिवसासाठी परगावी जाण्याची आपल्या वेळा-पत्रकांत नोंद आहे आणि आपल्या मुलीने शाळेचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करून एका स्प्रधेत 'कांस्य पदक' पटकाविले आहे आणि शाळेत उद्या तिचा कौतुक समारंभ आहे ज्यात पालक म्हणून उपस्थिती देणे आपल्या मुलीला अपेक्षित आहे. अश्या वेळेस आपण जर आपल्या वेळा-पत्रकाला प्राथमिकता देऊन परगावी गेलो आणि एखादा मोठा फायद्याचा अनुबंध जरी आपण केला तरी आपण अनुपस्थित राहून आपल्या मुलीच्या जीवनातील सोनेरी क्षणांना मुकलो. चौकोन २ च्या कामात धनार्जनापेक्षा, प्रसिद्धीपेक्षा 'तत्वांना' प्राथमिकता  असते. तत्वांसाठी आपले वेळा-पत्रक गडबडले तरी अपराध-बोधाने ग्रस्त न होता तत्वांना, माणसांना प्राथमिकता देत आपले कार्य करीत राहिले पाहिजे.
  • लवचिकता : आपल्या नियोजनाच्या साधनांवर यशस्वी लोकांचा 'ताबा' असतो. नियोजनांची साधने त्यांचे 'दास' बनून राहतात 'स्वामी' बनून नाही. नियोजनाची साधने ही आपले काम सोपे करण्यासाठी असतात म्हणून त्यात लवचिकता असणे अतिशय गरजेचे आहे. वेळा-पत्रक आखणी झाल्यावर जर ती आपल्या स्वभावाच्या अनुकूल नसली, गरजांच्या अनुकूल नसली, आपल्या कार्य-पद्धतीच्या अनुकूल नसली तर आपल्याला त्या वेळा-पत्रकाचे अनुसरण करणे फार जड जाईल व अनुसरण करण्यात मजा देखील येणार नाही आणि, हळू-हळू आपली साप्ताहिक नियोजनाची सवय मोडत जाईल. म्हणून आपली नियोजनाची साधने ही अगदी वैयक्तिक आणि लवचिक देखील असायला पाहिजे. वेळा-पत्रकांत एकदा झालेली नोंद ही "दगडाची रेष' होता कामा नये, आपल्याला वेळ-काळ-स्वभाव-परिस्थिती-अनुकुलता-कार्यपद्धती या सर्वाचा विचार करून जर त्यात फेरबदल अपेक्षित वाटला तर तो करण्यास सदैव तत्पर राहिले पाहिजे.
  • सहजता : यशस्वी लोकांची नियोजनांची साधने  अगदी सहज असतात. त्यांना ती आपल्या बरोबर बाळगणे अगदी सहज वाटते आणि फावल्या वेळात ते आपल्या नियोजनाच्या साधनांचा आढावा घेत असतात . उदाहरणार्थ आपले नियोजनाचे मुख्य साधन आपले वेळा-पत्रक हे नेहमी आपल्या बरोबर नेता आले पाहिजे. आपण आपले वेळा-पत्रक एका मोठ्या तख्त्यावर लिहून  घरी  ठेवले तर ते आपल्याला आपल्या बरोबर नेहमी बाळगणे अवघड जाते. म्हणून आपण काळा-बरोबर स्वत: मध्ये बदल करीत राहणे गरजेचे आहे. आपण आधुनिक साधनांचा पुरे-पूर वापर करणे शिकायला हवे. उदाहरणार्थ आपण जर आपले वेळा-पत्रक आपल्या भ्रमणध्वनि यंत्रामध्ये बनविले किंवा आपल्या वेळा-पत्रकाचा फोटो काढून आपल्या मोबाईल मध्ये ठेवले आणि प्रत्येक महत्वाच्या कामाचे रिमाइन्डर त्यात लावून ठेवले तर आपल्या एकही कामाची वेळ चुकणार नाही आणि आपण आपली सर्व कामे उत्तमरीत्या करणे आपल्याला सोपे वाटेल. 

      आज येथेच विरमतो आहे . उद्या आपण  यशाच्या दिशेला पुढील पाऊल 'स्वयं-व्यवस्थापन' कडे उचलू कारण वेळ-व्यवस्थापनाचा पाया 'स्वयं-व्यवस्थापन' आहे. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।




Friday, August 19, 2016

यशस्वी व्यक्ती यश-संपादनासाठी कुठल्या कार्यांची निवड करतांत? वेळ-व्यवस्थापन भाग-१३ (Time Management Part-13)



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

                       वैज्ञानिक दृष्टीकाणातून स्टीफन कवे यांच्या मताप्रमाणे महत्वपूर्ण आणि तातडीचे या दोन आधारावर आपल्या कामांची विभागणी केल्याने या विभागणीचे काय परिणाम होतात ते आपण काल बघितले. आपण बघितले की आपला अधिकतम वेळ चौकोन १ मधील कामांमध्ये व्यतीत केला तर आपला मानसिक तणाव वाढतो, आपली शारीरिक प्रकृती खालवते आणि आपण सतत एक टाईम बॉम्ब हातात घेऊन तो फुटायच्या आधी अर्थात आपल्या कामांची मुदत संपण्याआधी ते काम कसे-बसे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो.आपल्या हृदयात आपले उद्दीष्ट नीट मुरलेले नसल्यामुळे आपण बऱ्याचदा आपला मौल्यवान वेळ चौकोन ३ मधल्या विना महत्वाच्या कामांमध्ये वाया घालवतो. आपण अशी कामे आपल्यासाठी महत्वाची आहेत की नाही ?, याने आपल्याला काही साध्य होणार आहे की नाही ? असा विचार न करता आपण केवळ ही कामे तातडीचे दिसून येतात म्हणून करतो. परिणामी आपल्या मनांत काही साध्य न झाल्यामुळे नकारात्मक भाव उत्पन्न होऊ लागतात. आपले 'लक्ष्य ठरविणे' ही संकल्पनाच आपल्या मनांत उदयास आलेली नसते म्हणून आपले 'नियोजन' आणि 'परिणाम' या दोन्हींची किंमत समजून न घेता आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून असल्या विन-महत्वाच्या कामांत आनंदाने गुरफटत राहतो. चौकोन ३ मधील कामे करून थकल्यावर, असल्या कामांचा वीट आल्यावर आपण चौकोन ४ मधील विना-तातडीच्या आणि विना-महत्वाच्या कामांकडे वळतो आणि तेथे आपला वेळ वाया घालू लागतो. चौकोन ३ आणि ४ मध्ये वावरताना बऱ्याचदा आपल्या हातून चौकोन १ मधील तातडीच्या आणि महत्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होते, ती कामे वेळेवर पूर्ण होत नाही ज्याच्या परिणाम स्वरूप आपल्याला भयंकर मानसिक त्रास, आर्थिक नुकसान आणि नोकरी सुटण्यासारखे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते आणि आपल्या पदरी पडते 'अवसाद', 'पश्चात्ताप' 'डिप्रेशन' ,'विषाद' जे न केवळ आपल्या मनाला पोखरते, आपल्या शारीरिक प्रकृतीवर देखील गंभीर दुष्परिणाम पाडते.

                           म्हणून स्टीफन कवे यांनी यशस्वी व्यक्तींच्या  सवयींचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला की यशस्वी व्यक्ती केवळ चौकोन २ च्या कामांना सर्वाधिक वेळ देतात. चौकोन ३ आणि ४ च्या कामांकडे मुळीच लक्ष घालीत नसल्याने त्यांना चौकोन २ च्या कामांसाठी अधिक वेळ मिळतो. चौकोन १ ची तातडीची, आणी-बाणीची कामे यशस्वी व्यक्तींच्याही जीवनांत येतातच पण यशस्वी व्यक्ती चौकोन २ च्या कामांना अधिक वेळ देऊन त्यांच्यावर मात करण्याची पूर्व-तयारी करून ठेवतात. आणी-बाणीच्या कामांचे, मार्गात येणाऱ्या अडथळ्यांचे पूर्वीच आकलन करून त्यांच्यावर संभावित उपाय शोधून , ठरवून ठेवतात. परिणामी त्यांच्या चौकोन १ मधील कामांच्या यादीचा आकार अगदी छोटा होतो व त्यांना अश्या  कामांमध्ये फारसा वेळ जात नाही. ते मानसिक तणावा पासून पूर्णपणे मुक्त, शारीरिक प्रकृतीने बळकट आणि टाईम बॉम्बला अगदी सहजपणे 'डी-फ्युज' करीत यशाच्या दिशेने पुढे मार्गक्रमण करीत राहतात. आणी-बाणीच्या प्रसंगांचा, मार्गातील अडचणींचा त्यांच्या मनावर मुळीच ताण पडत नाही. 

                             चौकोन २ मधील कामे म्हणजे यशस्वी व्यक्ती कोणत्या प्रकारची कामे करीत असतात हा विचार आपल्या मनांत उठणे अगदी साहजिकच आहे. चौकोन २ मधील कामे खालील सहा महत्वाच्या 'निकषांवर' (Criteria) आधारलेली असतात -


  • सुसंगतपणा -  आपले जीवनाचे ध्येय आणि आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी यात सुसंगतपणा असणे गरजेचे आहे. आपले ध्येय जो पर्यंत आपण ठरविलेले नसतील तोपर्यंत आपली दिशा ठरणार नाही आणि आपले पाऊल जर ध्येयाच्या दिशेने नसून उलट्या दिशेला उचलले गेले तर आपण ध्येयापर्यंत कधीच पोचू शकणार नाही, यश कधीच गाठू शकणार नाही. ध्येय ठरलेले नसेल आणि आपले पाऊल यशाच्या दिशेने जरी उचलले गेले तरी मार्गात पुढे येणाऱ्या असंख्य वळणांवर आपण योग्य वळणा वरच वळू याची काही "शाश्वती" (Guarantee) नाही. एखाद्या वळणावर आपले वळण चुकेल आणि आपण उलट्या दिशेने जाऊ लागू. याउलट जर आपले ध्येय ठरलेले असले, आपण त्याला मनापासून स्वीकारले असले तर ते आपल्या मनांत खोलवर रुजेल आणि आपल्याला डोळसपणे प्रत्येक वळणावर योग्य मार्गाचा  निवड करणे सोपे होईल. आपण योजनेची आखणी करतांना आपल्या वैयक्तिक 'ध्येय-वाक्याला' (Personnel Mission Statement) स्थान असणे फार गरजेचे आहे. योजनेच्या आखणीत आपल्या यशाच्या दिशेतील प्रवासाचा प्रत्येक टप्पा ठरलेला असला पाहिजे, स्पष्टपणे रेखांकित असला पाहिजे. आपल्या अर्जुनाप्रमाणे केवळ आपले लक्ष्यच नजरेस पडले पाहिजे तेव्हां आपले प्रत्येक पाऊल योग्य दिशेने उचलले जाईल.

  • संतुलन - जीवन जगताना आपल्या सर्व भूमिकांमध्ये आपले संतुलन असणे फार गरजेचे आहे. आई/वडील, पुत्र/पुत्री, पती/पत्नी,जावई/सून, सासरा/सासू,भाऊ/बहीण, काका/काऊ, मामा/मामी, आत्या/अतोबा, मित्र/मैत्रीण, मालक/नोकर, व्यावसायिक भागीदार ईतर सर्व भूमिकांचे अगदी  संतुलितपणे निर्वहन करणे आपल्याला आले पाहिजे. कुठल्याही नात्याची किंवा भूमिकेची अवहेलना न करता अगदी सहजपणे सर्व भूमिका हाताळता आल्या पाहिजे. आपले  आरोग्य, आपले कुटुंब, आपले व्यावसायिक संबंध, आपले सामाजिक संबंध  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या स्वत;ची "अपेक्षित छवी" यापैकी कुठल्याही एकाकडे दुर्लक्ष होता कामा नये. या सर्वांचे उत्तम संतुलन साधता आले पाहिजे.  या सर्वांसाठी आपल्या दैनंदिन कार्यक्रमांत स्थान असणे अतिशय गरजेचे आहे जेणेकरून हे संतुलन आपल्याला साधता येईल. 
         विस्तार भयामुळे आज येथेच विरमणे योग्य वाटते आहे. पुढील चार निकषांवर उद्या चिंतन करूया. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Thursday, August 18, 2016

तातडीच्या कामांची यादी कशी कमी करावी ? वेळ-व्यवस्थापन भाग-१२ (Time-Management Part-12)




।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

             कामाची विभागणी वैज्ञानिक दृष्टीकोणातून 'महत्वाची' आणि 'तातडीची' अश्या दोन प्रकारांच्या आधारावर  चार विभागांमधे कशी करावी यावर आपण काल विचार केला. आज आपण आपल्या कामांच्या यादीतील याच चार विभागांच्या कामांचे प्रमाण यावर चिंतन करूया.
 
       


                      वरील चित्रामध्ये चार चौकोनात चार प्रकारच्या कामांची विभागणी करावी.

                 चौकोन १ मधील कामे महत्वपूर्ण आणि तातडीची दोन्हीं आहेत. त्वरित लक्ष घालून करायला हवी अशी ही कामे असतात व त्वरित केली तर महत्वाचे परिणामही मिळतात. या चौकोनातील कामांना आपण
 'आणी-बाणीची' किंवा 'अडचण/समस्या/आपत्ती' असे म्हणतो. आपल्या दैनिक जीवनांत अशी बरीच कामे आपल्याला करावी लागतात, समस्या/अडचणींशी झुंजावे लागते. आपण जर या अडचणीवर किंवा समस्यांवर मात केली तर आपण केवळ 'आणी-बाणी व्यवस्थापन' , 'आपत्ती व्यवस्थापन' करीत केवळ 'अंतिम मुदतीचे अनुसरण करणारे' (Meeting Deadlines) म्हणवू .  आपण चौकोन १ मधील कामांमध्ये अधिक रस घेतला तर आपण त्यातच बुडून जाऊ. एका मागे एक समस्या, अडचणी, तातडीचे कामे येतच राहतील आणि त्यांना पूर्ण करण्यातच आपण आपला मौल्यवान वेळ गमावून देऊ आणि आपल्याला क्षणभर विसावा मिळावा, मनोरंजन व्हावे म्हणून आपण आपले लक्ष चौकोन ४ मधील कामांकडे वळवू जी महत्वाची पण नाहीत आणि तातडीची पण नाहीत.

                 अश्याप्रकारे आपला अधिकतम वेळ चौकोन १ मधील कामात व्यतीत झाल्याने आपला मानसिक तणाव वाढतो, तब्यत खालवते, सदैव एक टाईम- बॉम्ब आपल्या हातात असतो व तो कधी ही फुटू शकतो म्हणून आपण त्याला घेऊन वेळ-साधण्यास यंत्रवत पळत असतो. 


                      आपण बऱ्याचदा आपला वेळ चौकोन ३ मधील "तातडीची  पण बिना महत्वाची' कामे करण्यात आपला वेळ घालवतो. कारण तातडीची कामे करतांना आपण मुळीच विचार नाही करत की खरच हे काम करणे गरजेचे आहे कां? आपल्यासाठी हे काम महत्वपूर्ण आहे कां? आपण हे काम कुणा दुसऱ्या व्यक्तीवर नाही सोपवू शकत कां? आपण केवळ ती कामे तातडीची आहेत म्हणून विना विचार करता करू लागतो. अश्यामुळे आपला अधिकतम वेळ विना-महत्वाच्या कामांमध्ये वाया जातो आणि आपल्या मनांत नकारात्मक भाव उत्पन्न होऊ लागतात, आपल्या मनांत 'लक्ष्य ठरविणे' ही संकल्पना उदयाला येतच नाही, 'नियोजन' आणि 'परिणाम' या दोन्हींकडे आपले दुर्लक्ष होते कारण त्याची किमत समजून घ्यायला आपल्याकडे वेळच नसतो.  चौकोन ३ मधील कामे करून-करून थकल्यावर आपण चौकोन ४ चा आश्रय घेतो आणि विना तातडीची आणि विना महत्वाची कामे अगदी 'उगाच' करू लागतो. याचे फार गंभीर आणि घातक परिणाम समोर येतात.  चौकोन ३ आणि ४ मधील कामे करतांना आपले चौकोन १ मधील कामांकडे दुर्लक्ष होते किंवा आपण जाणतेपणाने चौकोन १ मधील कामांकडे दुर्लक्ष करतो. परिणाम-स्वरूप  'एक बेजवाबदार व्यक्ती' च्या रूपांत आपली छवी कार्यक्षेत्रात किंवा समाजात बनते. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या याच कारणामुळे सुटतात कारण ते नेहमी व्यस्त असतात आणि आपल्या मुलभूत गरजांसाठी, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहतात, नेहमी मदतीची अपेक्षा करीत असतात.  पण 'विना महत्वाच्या' कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांच्या व्यस्ततेचा फायदा त्यांच्या कंपनीला होत नसतो. 

                          स्टीफन कवे यांच्या मते यशस्वी व्यक्ती चौकोन ३ आणि ४ यांच्या मधील कामांकडे मुळीच लक्ष देत नाहीत कारण तातडीच्या असो वा नसो ती कामे महत्वाची नसतात. याशिवाय यशस्वी व्यक्ती चौकोन २ मधील कामांवर अधिक लक्ष आणि वेळ देऊन चौकोन १ च्या कामांच्या यादीचा आकार पण अगदी लहान करतात.  

                           स्टीफन कवे यांच्या मते चौकोन २ मधील कामांसाठी अधिक वेळ देणे 'यशस्वी वैयक्तिक व्यवस्थापनासाठी' फार गरजेचे आहे. तातडीच्या नसलेल्या पण महत्वाच्या गोष्टीं चौकोन २ मध्ये जितक्या अधिक असतील तितक्या लांब पल्ल्याचे यश आपण मिळवू शकतो कारण यात नाते-संबंध केवळ टिकविणेच नव्हे तर वाढविण्याचा विचार केलेला असतो, नियमित व्यायामाद्वारे आरोग्याचा विचार केलेला असतो जेणेकरून महत्वाच्या कामाच्या दिवशी आपल्या प्रकृती-संबंधित अडचण येत नसते, वैयक्तिक प्राथमिकतेचे निर्धारण केलेले असते, आपले ध्येय-वाक्य ठरवून आपली दिशा निर्धारित केलेली असते, बिघाडापुर्वीच दुरुस्तीचा विचार केलेला असतो, आपल्या कामांचा दूर-दृष्टीने विचार केलेला असतो त्यामुळे मार्गातील संभावित अडचणी /समस्यांवर विचार केलेला असतो. 

                                विस्तार भयामुळे आज येथेच विरमतो आहे ! उद्या चौकोन २ मधील कामांवर आणखी विस्तृत चिंतन करूया. 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।          
           









Wednesday, August 17, 2016

विज्ञानिक दृष्टीकोणातून कामांची विभागणी कशी करावी ? वेळ-व्यवस्थापन भाग-११ (Time Management Part-11)




।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षा-बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

कामांची व वेळची विभागणी आणि कार्य-वाटपामुळे यशाच्या दिशेने आपल्या प्रवासाची गति आश्चर्यजनकरीत्या वाढते हे आपण कालच्या चिंतनात बघितले. आज आपण आपल्या कामांची विभागणी कश्या प्रकारे करावी यावर चिन्तन करूया. 

अमेरिकेतील सुप्रसिद्ध शिक्षा-शास्त्री, लेखक, वक्ता आणि उद्योजक स्टीफन कवे (Stephen Covey) यांनी आपल्या "अति-परिणामकारक व्यक्तींच्या ७ सवयी" "7 Habits of Highly Effective People"  या पुस्तकात वैज्ञानिक दृष्टीकोणातून कामांची विभागणी कशी करावी हे समजाविले आहे. त्यांच्या मताप्रमाणे आपल्याला सर्वप्रथम कामांची एक विस्तृत यादी तयार करायला हवी आणि मग यादीतील सर्व कामांची विभागणी खालील प्रमाणे करावी. 


चौकौन क्रमांक १ मधे महत्वपूर्ण आणि तातडीच्या कामांची नोंद करावी, चौकौन क्रमांक २ मधे महत्वपूर्ण परंतु तातडीचे नाहीत अश्या कामांची नोंद करावी, चौकौन क्रमांक ३ मधे महत्वपूर्ण नाही परंतु तातडीची अश्या कामांची नोंद करावी आणि चौकौन क्रमांक ४ मधे महत्वपूर्ण नाही आणि तातडीचीही नाहीत अश्या कामांची नोंद करावी.  खालील चित्राने ही विभागणी आणखी स्पष्ट होईल -


आपल्या सर्व कामांची नोंद वरील दोन्हीं चित्रात दिलेल्या चार चौकोनांमधे करावी. स्टीफन कवे यांच्या मते अश्याप्रकारे कामांची  विभागणी करण्यास प्रारंभ केल्यावर सुरुवातीला चौकोन १, ३ आणि ४ मधे आपल्या कामांची यादी फार मोठी असणार आहे व चौकोन २ मधील कामांची यादी सर्वात लहान असेल. याचा अर्थ आपण केवळ त्याच कामांकडे गंभीरपणे लक्ष घालतो जी तातडीची असतात मग ती महत्वाची असो वा नसो तसेच आपण बऱ्याच अश्या कामांमध्ये गुरफटलेले असतो जी आपल्यासाठी महत्वपूर्ण पण नसतात आणि त्यांना तातडीने करणे ही गरजेचे नसते पण आपल्याला अशी कामे करणे आवडते किंवा सोपे जाते म्हणून आपण उगाच ती कामे करून आपला वेळ वाया दवडत असतो. उदाहरणार्थ एखादी टी.व्ही. मालिका बघण्यात आपण आपल्या दिवसातील अर्धा किंवा एक तास दररोज फुकट घालवतो. त्या मालिकेतू आपल्याला काही एक साध्य होत नाही, आपले ज्ञान वाढत नाही उलट त्यातील खलनायक/खालानायिकेची कट-कारस्थाने आपल्या विचारांना दुषित जरूर करीत असतात पण  केवळ आपल्याला ती मालिका आवडते म्हणून आपण ती पाहत असतो. आपण अश्या मालिकांनी होणारा दुष्परिणाम लक्षात घेत नाही की कळत-नकळत त्या मालिकेचा आपल्या विचारसरणी वर, आपल्या वर्तनावर असर होत असतो व आपल्या उत्कर्षा ऐवजी आपला अपकर्ष त्याने होत असतो. 

            म्हणून आपण आपल्या मेंदूतील सर्व कामांची वरील चित्रांमधील तालिकेत प्रामाणिकपणे  विभागणी करून त्याचे वेळो-वेळी विश्लेषण करीत राहावे आणि आवश्यक असल्यास कामांना एका चौकोनातून दुसरीकडे स्थानांतरीत देखील करावे जेणेकरून आधी महत्वपूर्ण वाटणारे काम विश्लेषण, अत्मावालोकन केल्यानंतर महत्वहीन पण वाटू शकते आणि चौकोन १ किंवा ३ मधील कामे चौकोन ४ मधे पण स्थानांतरीत पण होऊ शकते. म्हणून ही विभागणी पेन्सिलीने करावी म्हणजे खोडून दुरुस्त करणे सहज शक्य होईल.

स्टीफन कवे यांच्या मते चौकोन २ च्या कामांकडे  विशेष लक्ष द्यावे आणि हळू-हळू या चौकोनातील कामांची यादी सर्वात मोठी व्हायला हवी. या चौकोनातील यादी मोठी झाल्याने कधी पण "तहान लागल्यावर विहीर खणायची" गरज पडणार नाही. 

विस्तार भयामुळे आज येथेच विरामतो आहे, उद्या याच विषयावर आणखी खोलात जाऊन चिंतन करूया. 

आपल्याला वरील प्रमाणे विभागणी करण्यासाठी वरील चित्रे Microsoft Excel , Microsoft Word  अथवा PDF format मधे हवी असल्यास मला stavanstuti@gmail.com वर ईमेल करावा अथवा +91 9826024137 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. आपल्याला वांछित सामग्री ईमेल अथवा Whats App द्वारे पाठविण्यात येईल.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।



Tuesday, August 16, 2016

कार्य-वाटपचे आश्चर्यजनक परिणाम ! वेळ-व्यवस्थापन भाग-१० (Time Management Part 10).

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

                  काल आपण बघितले की आपल्या वेळ-व्यवस्थापनामध्ये सर्वात  मोठी अडचण आपली अपूर्ण कामे असतात. या अपूर्ण कामांचा ढीग आपल्या समोर तयार झाला की आपल्याला काही सुचत नाही आणि या ढीगात आणखी कामांची भर रोज पडत असल्यामुळे हा ढीग आणखी मोठा होत जातो. अपूर्ण कामांच्या वाढत्या दबावामुळे आपल्याला फार मानसिक त्रास होतो. या त्रासामुळे आपली कामे आणखी बिघडत जातात, परिणामस्वरूप आपला आत्म-विश्वास कमी होत जातो. जी कामे आधी आपण अगदी सहजपणे करीत होतो, ती कामे पूर्ण करणे तर दूर त्या कामांच्या विचारांमुळे आपल्याला घाम सुटू लागतो. याचे मुख्य कारण आपला आत्मविश्वास कमी होणे आहे. केवळ सर्व अपूर्ण कामांची एक यादी बनवून या परिस्थितीला मात देणे संभव आहे. सर्व कामांची यादी तयार झाल्यामुळे आपण आपल्या स्मरण-शक्तीवर अवलंबून रहात नाही. लेखी स्वरुपात आपल्या समोर कामांची यादी असल्यामुळे आपल्याला कामे आठवावी लागत नाही आणि ती वेळीच पूर्ण करता येतात.

                    आपली अपूर्ण कामांची यादी फार मोठी झाल्यास काळजी करू नये. अगदी सोपी वाटणारी, पूर्ण होण्यास अगदी कमी वेळ घेणारी कामें करावयास सुरुवात केली पाहिजे. प्रत्येक काम सम्पन्न झाल्यावर स्वत:ला शाबासकी देणे विसरु नये कारण अश्याने आपला आत्मविश्वास वाढत जातो,

                   सर्व कामांची यादी तयार झाल्यावर त्या कामांची कार्यालयीन, पारिवारिक आणि धार्मिक,अध्यात्मिक किवा सामाजिक या तीन विभागांमध्ये विभागणी करावी. याच प्रमाणे आपल्या दिवसभरातील किंवा आठवड्यातील एकूण वेळाची पण काल पाहिलेल्या ६ भागात विभागणी करावी. कामांची आणि वेळाची योग्य विभागणी झाल्यावर प्रत्येक कामाला पूर्ण करण्यास लागणाऱ्या  वेळाची गणना करून दिवसातून कुठल्या वेळात ते काम करायचे आहे, आठवड्याच्या कुठल्या दिवशी ते काम करायचे आहे हे ठरवावे.  

                      वरील विभागणी करतांना आपल्याला बरीच कामे अगदी फालतू आणि वेळ-खाणारी वाटतील, अश्या कामांना आपल्या यादीतून खोडून द्यावे नाहीतर अन्य दिवशी फावल्या वेळात ते काम पूर्ण करावे. 

                      'विभागणी' आणि  'कार्य-वाटप' करण्याची सवय अंगी बाणल्याने यश-सम्पादनाची गति आश्चर्यजनकरीत्या वाढते. कार्य-वाटप करतांना हे नेहमी ध्यानांत ठेवावे की ज्या व्यक्तीवर आपण कामाची जवाबदारी सोपवितो आहोत त्या व्यक्तीवर पूर्ण-पणे विश्वास ठेवायला हवा. एकदा कुणाला काम दिले की त्या कामाच्या मधे-मधे लुड-बुड कधीच करू नये. आपल्याला त्या  व्यक्तीला जर कामा सम्बन्धी काही निर्देश द्यायचे असेल तर ते त्याला आधी समजावून सांगितले पाहिजे. त्याने एकदा काम सुरु केले की मग आपण त्याच्याहून अलिप्त राहून त्याला गरज पडेल तेव्हां त्याच्या मदतीसाठी तयार रहावे. त्या व्यक्तीवर आपली कार्य-पद्धति लादण्याचा आग्रह चुकुनही धरु नये. प्रत्येक व्यक्तीची कार्य करण्याची पद्धत वेगळी असते, व त्याला स्वत:च्या सुविधेनुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य असेल पाहिजे. त्याच्या कार्य-पद्धतीचा सन्मान करावा आणि त्याला हवी ती मदत करण्यास आपण तयार असावे. मधे-मधे लुड-बुड केल्याने आपला वेळ वाया जातो आणि समोरच्या व्यक्तीची काम करण्याची रुची कमी होत जाते.  

                             कार्य-वाटप केल्यामुळे आपला वेळ देखील वाचतो. या वाचलेल्या वेळाचा आपण आपल्या कुऱ्हाडाला धार लाविण्यात अर्थात स्वत:च्या ज्ञानात भर घालण्यास उपयोग करावा. कार्य-वाटपाने आपले महत्व कमी होईल असे भय जरी आपल्याला वाटत असले तरी तसे प्रत्यक्षात घडत नाही उलट आपल्याला आपल्या  क्षमतेहून अधिक मोठी कामे करण्याची योजना आखणे आणि त्या योजनेला मूर्त रूप देणे शक्य होते. 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।
                          
                       


Monday, August 15, 2016

यश-प्राप्तीची गति कशी वाढवावी ? वेळ व्यवस्थापन भाग -९ (Time Management Part-9)

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

                  काल आपण बघितले की आपल्या मौल्यवान वेळेचा आपण जर चिंतन, मंथन आणि योजनेच्या आखणीत 'गुंतवणूक' केली तर वेळ-व्यवस्थापना द्वारे आपल्याला अपेक्षेहून कितीतरी पटीने यश मिळेल. ही 'गुंतवणूक' करण्यासाठी काय करावे हा प्रश्न आपल्या मनांत उठणे अगदी साहजिकच आहे. खालील उपाय करून बघितल्यास आपली चालढकल किंवा दिरंगाई करण्याची सवय तर हळू-हळू जाईलच, आपले वेळ-व्यवस्थापन स्वत: होत जाईल-
  • आपल्या वेळ-व्यवस्थापनामधील सर्वात मोठी अडचण आहे आपले अपूर्ण कामे. आपली बरीच कामे अपूर्ण राहिल्यामुळे आपण स्वत: वर मानसिक दबाव ओडवून घेतो आणि या मानसिक दबावामुळे बरीच कामे विसरून जातो कारण या सर्व कामांची एक 'अव्यवस्थित' यादी आपण आपल्या मेंदूत जपून ठेवतो ज्यात कामंची प्राथमिकता किंवा त्यांचा वरीयता  ठरलेला नसतो. जेव्हां जे काम आठवते ते करण्याचा प्रयत्न आपण करीत असतो. आपल्या स्मृतीच्या किंवा स्मरण-शक्तीच्या मर्यादेमुळे बरीच कामे आपल्याला वेळेवर आठवत नाही व आपण ती विसरून जातो आणि वेळ- निघून गेल्यावर अपराध-बोध आपल्याला ग्रासू लागतो ज्याच्या आपल्या कार्य-क्षमतेवर देखील प्रतिकूल प्रमाण होतो. या साठी आपल्या जवळ एक छोटीशी डायरी किंवा वही आणि पेन्सील नेहमी ठेवावी, व आपल्याला जेव्हां जी कामे आठवतील त्या कामांची नोंदणी त्यात करावी. रात्री झोपताना देखील या दोन्ही वस्तू आपल्या जवळच असाव्यात कारण अधिकतर कामे रात्री झोपतांना आठवतात. पहिल्यांदा हे करायला आपल्याला बराच वेळ लागेल पण आपला हा वेळ फार सार्थकी लागणार आहे म्हणून या कामाला प्राथमिकता द्यावी. ज्या लोकांना मोबाईल, कम्प्यूटर, ईमेल आणी इंटरनेट वरील ई-कॅलेंडर सारख्या आधुनिक साधनांचा वापर करणे सोपे वाटते त्यांनी त्याचा उपयोग केला तर आणखी उत्तम.
  • आपली यादी तयार झाली की त्या यादीला व्यवस्थित करणे फार गरजेचे आहे. यादीला व्यवस्थित करण्यासाठी त्यातील कामांवर शांतपणे विचार करावा की यातील कुठली कामे आपण करायला हवी आणि कुठली करायला नको कारण बरीच कामे गदी फालतू असतात, आपल्याला त्यातून काहीच मिळत नसते. आपण उगाच त्या कामांमध्ये लुडबुड करीत असतो.  जी कामे करणे आपल्यासाठी मुळीच उपयोगी नसेल त्या कामांना यादीतून खोडून द्यावे. अश्याने आपली यादी आणि मानसिक दबाव दोन्हीं कमी होतील आणि आपल्या दिवसातील बराच वेळ वाचेल.
  • यानंतर आपली खरी कार्य-योजना (Action Plan) आखणे सुरु होते कारण आपला कच्चा माल तैयार झालेला असतो. यानंतर आपल्या यादीची विभागणी तीन भागात करावी - १) कार्यालयीन, २) पारिवारिक आणि ३) धार्मिक,अध्यात्मिक किंवा सामाजिक.  या तीनही विभागांचे प्रमाण आपापल्या प्रमाणे कमी-जास्त असू शकते पण तीनही प्रकारची कामे आपल्या यादीत असणे फार गरजेचे आहे कारण कार्यालयीन कामाने आपल्याला 'आर्थिक मिळकत' होते, पारिवारिक कामाने आपल्याला 'जवाबदारी पूर्ण केल्याचे समाधान मिळते' आणि धार्मिक, अध्यात्मिक किंवा सामाजिक कामांमुळे 'आपले आत्मोन्नयन होते, आपले जीवन कृतार्थ' होते.

    कामांची विभागणी झाल्यावर आपल्या दिवस भराच्या २४ तासांची वेळाची विभागणी पण ६  भागात करावी - १) ६ ते ८ तास झोपेचा वेळ, २) ३ ते ४ तास दैनंदिन कामांचा वेळ, ३) ८ ते १० तास कार्यालयीन कामांचा वेळ, ४) २ ते ३ तास धार्मिक, आध्यात्मिक किंवा सामाजिक कामांचा वेळ, ५)  २ ते ३ तास पारिवारिक दायित्व निर्वहनाचा आणि कौटुम्बिक मनोरंजनाचा वेळ आणि ६)  किमान २ तास स्वत:च्या ज्ञानात वृद्धी करायचा, चिंतन, मनन आणि योजना आखणीचा वेळ.

    अश्याप्रकारे दिवसातील २४ तासांची किंवा आठवड्यातील १६८ तासांची विभागणी करावी जेणेकरून आपल्याला आपले उद्दिष्ट पूर्ण करणे सोपे जाईल, कुठलेही दडपण आपल्यावर येणार नाही आणि अगदी सहजपणे वरील तीनही विभागातील कामांना वेळ देणे सोपे जाईल.
  • कामांची यादी आणि विभागणी झाल्यावर सर्वात मोठे कार्य आहे कार्य-वाटप किंवा जवाबदारी-वाटप. याला आधुनिक व्यवस्थापनाच्या भाषेत 'Delegation' म्हणतात आणि हाच यशाचा सर्वात भक्कम 'पाया' आहे. आपण लहानपणी गणिते सोडविताना 'एक व्यक्ती एका कामाला १० दिवसात करतो तर ५ व्यक्ती त्याच कामाला किती दिवसात करतील?' हे गणित पण नक्की सोडविले असेल. या शिकवणीचा आपण व्यावहारिक उपयोग करीत नाही  जे करणे फार गरजेचे आहे. सगळी कामे आपण एकटे करीत बसलो तर कधीच वेळेवर पूर्ण होणार नाही म्हणून कार्य वाटप करणे फार गरजेचे आहे आणि ज्याला हे कळते त्याची यशाच्या दिशेने प्रवासाची गति कितीतरी पटीने वाढते. म्हणून कार्य-वाटप या सूत्राला अंमलात आणलेच पाहिजे. हे अमलात आणतांना आपल्या मनांत हे भय निर्माण होते की आपले महत्व कमी होईल पण असे मुळीच नसते कारण आपण खालच्या पायरीवरून पाय उचलून वरच्या पायरीवर पाय ठेवल्याखेरीज वर चढणे संभव होत नाही.
            विस्तार भयामुळे आज येथे विरमणे योग्य आहे, उद्या याच विषयाला पुढे वाढवू.


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


 

Sunday, August 14, 2016

वेळ, मानसिक आणि शारीरिक ऊर्जेचा 'उपयोग' करावा की 'निवेश' ? वेळ-व्यवस्थापन भाग-८ ( Time Management Part 8)

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

                 सर्वप्रथम आपणां सर्वांना 'स्वातंत्र्य-दिनाच्या' हार्दिक शुभेच्छा !

               काल आपण बघितले की आपल्या अनियमितपणा आणि अव्यवस्थितपणामुळे आपण कुठलेही कार्य करण्यात 'दिरंगाई' किंवा 'चालढकल' करीत असतो. आपल्या अनियमितपणा आणि अव्यवस्थितपणा साठी कारणीभूत असतो आपल्या डोक्यात राहणारा 'झटपट आनंद देणारा माकड' जो कुठलेही काम पूर्ण न करू देता आपले चित्त दुसरीकडे वेधतो आणि त्याच्या प्रभावामुळे आपण आपली कामे अर्धवट सोडून त्याच्या बरोबर सैराट पळतो. 

         या 'झटपट आनंद देणाऱ्या  माकडा'च्या  नादी लागल्याचे फार गंभीर आणि दुष्परिणाम समोर येतात. आपल्या जवळ अपूर्ण /अर्धवट कामांचा ढीग जमा होतो ज्यामुळे आपण पार भांबावून जातो. कामे अपूर्ण राहिल्यामुळे आपला मनस्ताप वाढत जातो, काही करण्याची ईच्छा होत नाही, कामाच्या काळजी आणि चिन्तेमुळे मन अधिक व्यग्र होते, अर्धवट कामामुळे होणाऱ्या परिणामाचे भय वाटू लागते, अपराध-बोध वाढू लागतो आणि आपला आत्मविश्वास हळू-हळू कमी होत जातो.

               चालढकल करण्याच्या सवयीवर मात करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्वत:साठी एक योग्य  आणि अनुकूल दिनचर्या आखून त्याचे अनुसरण सुरु केले पाहिजे. दिनचर्येप्रमाणे जी कामे आपण केली त्यासाठी स्वत:ला शाबासकी दिली पाहिजे, पुरस्कृत केले पाहिजे जेणेकरून  स्व-प्रवृत्त होऊन दिनचर्येचे पूर्णपणे अनुसरण संभव होईल आणि आपल्या स्वभावात नियमितता हळू-हळू 'मुरु' लागेल. आपली दिनचर्या नियमित झाली की आपल्याला प्रत्येक श्रेणीच्या कामांसाठी निश्चित वेळ मिळत जाईल. आपली 'आवड' आणि 'गरज' या दोन गोष्टींच्या आधारवर आपण जर आपल्या कामांची प्राथमिकता ठरवली आणि त्यांची विभागणी प्रथामिकतेच्या आधारावर एका वरीयता  सूचीत केली तर कामे करणे आणखी सोपे आणि आनंददायक होईल. पण कामे आटोपल्यावर स्वत:ला 'शाबासकी' देऊन पुरस्कृत करणे विसरू नये. तसेच आपल्या मेंदूला देखील सकारात्मक विचारांचे खाद्य नियमितपणे पुरवायला हवे आणि यासाठी आपल्याला चांगल्या पुस्तकांचे वाचन मुख्यत्वे यशस्वी व्यक्तींचे चरित्र वाचायला हवे. आपल्या मेंदूला टीव्ही च्या मालिकांपासून दूर ठेवावे, मालिकांमध्ये आपण गुंतत जातो, आपला वेळ तर वाया जातोच, आपले विचार देखील दुषित होतात. 

                चालढकल करण्याच्या सवयीवर मात करण्यासाठी वरील उपायांशिवाय स्वत:ला खालील प्रश्न विचारून त्यांचे उत्तर शोधायला हवे- 

            १. आपण आपल्या मानसिक आणि शारीरिक उर्जेचा योग्य उपयोग करून घेत आहोत कां ?

            २. आपल्या वेळाचा जो उपयोग आपण करीत आहोत तो 'योग्य' आहे कां ?
            ३. आपल्या दिनचर्येत 'आराम' चे प्रमाण योग्य आहे  की  नाही ?            
           ४. आपण आपला अधिकांश वेळाची 'गुंतवणूक' करीत आहोत की केवळ 'खर्च' करीत आहोत ? 
           ५. आपल्या दिनचर्येत आपली 'आवड' आणि आपली 'गरज' याचे प्रमाण संतुलित आहे कां? 
          ६. आपण आपल्या दिनचर्येत 'चिंतन', 'मंथन' आणि पुढील 'योजना-आखणी' साठी वेळ दिलेला आहे की नाही ?
            

                  या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतांना आपल्याला हे ध्यानात येईल की आपण आपल्या मानसिक व  शारीरिक ऊर्जेचा आणि आपल्या वेळाचा 'व्यय' करीत आहोत,अपव्यय करीत आहोत की 'निवेश' करीत आहोत. या तिन्हींच्या  'निवेशा' ला सर्वाधिक प्राथमिकता द्यायला हवी.

                   उत्तरे देतांना हे ध्यानांत ठेवावे की योग्य आणि अयोग्य ही दोन शब्दे 'व्यक्ती-सापेक्ष' आहे अर्थात एका व्यक्तीला योग्य वाटणारे दुसऱ्या व्यक्तीला अयोग्य वाटू शकते तसेच एका व्यक्तीला अयोग्य वाटणारे दुसऱ्याला योग्य वाटू शकते पण म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन करणे, तिला योग्य ठरवणे  योग्य नव्हे.  ईतरांचा विचार करून आपल्याला योग्य-अयोग्य ठरविता आले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला स्वत:मध्ये योग्य-अयोग्याची निर्णय क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. ही निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी आपल्या दिनाचार्येतील अधिकाधिक वेळ 'चिंतन', 'मंथन' आणि 'पुढील योजनेच्या आखणीसाठी' द्यायला हवा.

                    अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी म्हंटले आहे "मला जर एक झाड कापण्यासाठी ६ तासांचा वेळ दिला, तर त्यातील पहिले ४ तास मी कुऱ्हाडाला धार करण्यास देईन". हा विचार वेळ-व्यवस्थापनाचा महामंत्र आहे आणि  सर्व थोर व्यक्तींच्या आचरणातून या महामंत्राचा जयघोष  स्पष्ट  ऐकू येतो. 


                      म्हणून दिवसातील अधिकांश क्षणांचा आपण  चिंतन, मंथन आणि योजनेच्या आखणी मध्ये 'निवेश' केला तर वेळ-व्यवस्थापन करणेच नव्हे तर त्याद्वारे यश-संपादन करणे देखील अतिशय सोपे जाईल. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Saturday, August 13, 2016

अनियमितपणा आणि अव्यवस्थितपणावर मात कशी करावी ? वेळ-व्यवस्थापन भाग-७ (Time Management Part-7)

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

           काल आपण बघितले की आपल्या वेळ-व्यवस्थापनाच्या मार्गात सर्वात मोठी अडचण आहे आपली "चालढकल करण्याची", "दिरंगाई करण्याची" वाईट सवय ज्याला आधुनिक व्यवस्थापनाच्या भाषेत "Procrastination" म्हणतात.  

             या सवयीसाठी कारणीभूत असतो आपल्या डोक्यात सतत उड्या मारत राहणारा एक माकड ज्याला आपण  "झटपट आनंद देणारा माकड" असे म्हंटले आहे कारण तो आपल्याला कुठलेही काम एकतर सुरूच नाही करू देत आणि सुरु जरी करू दिले तरी ते पूर्ण न करता आपल्याला मेंदूला अन्य बरीच कामे, विचार सुचवतो आणि हातातले काम अर्धवट सोडून लगेच दुसरे काम करण्यासाठी प्रवृत्त करतो, दुसरे काम ही पूर्ण नाही करू देत लगेच तिसऱ्या कामाकडे वळवतो. असा स्वच्छंदपणे "त्रैलोकी" भ्रमण करणारा हा माकड आपल्याला कुठलेही काम पूर्ण करू नाही देत आणि तार्किक कारणे देऊन आपल्याला सतत हे पटवत राहतो की आपण जे करीत आहे तेच योग्य आहे.  थोडक्यात म्हंटले तर हा माकड आपल्या 'मेंदूच्या स्टेयरिंगचा ताबा घेतो' आणि आपल्याला 'यशाच्या विरुद्ध दिशेला' घेऊन जातो आणि आपण देखील स्वखुशीने याच्या स्वाधीन होऊन यशाच्या विरुध्द दिशेने वाटचाल सुरु करतो.

                आपण स्वत: जर या "माकडाच्या हातात कोलीत" दिली तर आपल्या यशाची नौका तरण्या ऐवजी बुडेल हे निर्विवाद आहे. 

                  आपल्याला चालढकल किंवा दिरंगाई ची सवय मोडण्यासाठी प्रयत्न करण्याआधी या सवयी मागची कारणे शोधायला हवी. कारणे शोधल्याखेरीज कितीही प्रयत्न केले तरी ही सवय मोडता येणार नाही, म्हणून आपण आधी या सवयी मागची कारणे बघूया. 

                   दिरंगाई किंवा चालढकल या मागचे सर्वात मोठे कारण आहे आपली "अनियमित दिनचर्या". आपली दिनचर्या आपण नियमित करण्याचा फार प्रयत्न करतो पण ते करणे आपल्याला जमत नाही. कां जमत नाही ? कारण आपण आपली दिनचर्या ठरवताना ती 'आदर्श' असावी यावर जोर देतो पण आपली दिनचर्या ही आदर्श असण्यापेक्षा आपल्यासाठी 'योग्य' असावी यावर आपण ११ ऑगस्ट २०१६ रोजी "आपली दिनचर्या 'आदर्श' असावी की 'योग्य' असावी ? वेळ-व्यवस्थापन भाग-५"  या विषयावरील लेखात पाहिले आहेच. म्हणून सर्वप्रथम आपल्याला अनुसरण (Follow) करण्यास  'अनुकूल' अशी आपल्यासाठी "योग्य" दिनचर्येची आखणी करून तिचे अनुसरण प्रारंभ केले पाहिजे.  दिनचर्या  आखून ती एका मोठ्या बोर्डावर लिहावी आणि येत-जाता आपली सतत नजर पडेल अश्या जागेवर तो बोर्ड लावावा. नजर पडल्यावर त्या बोर्डाकडे दुर्लक्ष न करता थोडे थांबून लक्ष देऊन वाचायला हवी आणि आपण त्या दिनचर्ये प्रमाणे काय केले त्यासाठी आधी स्वत:ला 'शाबासकी' द्यावी आणि जे सुटले ते उद्यापासून सुटणार नाही असा दृढ संकल्प करावा. असे येत-जाता सारखे केल्याने ती दिनचर्या आपल्या मनावर 'खोलवर' रुजते. हे करतांना आपल्या डोक्यातील माकड 'सुटले  तर सुटले, एकदम सारे काही जमणार नाही' असा विचार मनांत आणून आपल्याला परावृत्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल म्हणूनच आधी जे जमले त्यासाठी स्वत:ला "शाबासकीदेणे आणि नंतर जे सुटले त्यासाठी "उद्या पासून हे मुळीच सुटणार नाही" असे "सकारात्मक खाद्य" त्या माकडाला पुरविणे फार गरजेचे आहे. अश्याने त्या दिनचर्येचे पूर्णपणे  अनुसरण करण्याचा आपला निश्चय ठाम होत जाईल आणि हळू-हळू आपल्या जीवनात 'नियमितता' येईल. 

             दिरंगाई किंवा चालढकल करण्यामागचे दुसरे मोठे कारण आहे "आपला अव्यवस्थितपणा" . आपण आपले प्रत्येक काम व्यवस्थितपणे केल्याने आपला बराच वेळ वाचतो. व्यवस्थितपणा आणण्यासाठी आपल्याला स्वत:वर बरेच काम करावे लागते. आपली 'आवड' आणि आपली 'गरज' या दोन्हीला नीट समजून त्याप्रमाणे आपल्या कुठल्या कामांना 'प्राथमिकता' द्यायला हवी आणि कुठल्या कामांना दुय्यम दर्जा द्यायला हवा हे ठरवायला हवे. उदाहरणार्थ 'अंतर्जालावर' भ्रमण (Internet-surfing)  करणे आणि त्याद्वारे आपले मनोरंजन, ज्ञानार्जन करणे आपल्याला फार आवडते पण आपण जर आवश्यक कामे सोडून हे करीत बसलो तर आपला मौल्यवान वेळातील एक मोठा भाग वाया जाईल, आपली कामे पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला भरपूर मानसिक त्रास होईल, कार्यालयातील आपल्या  'छवी' वर प्रतिकूल प्रभाव पडेल, मग अश्या मनोरंजनाचा आणि ज्ञानार्जनाचा आपल्याला काय फायदा झाला ?  मनोरंजना ऐवजी आपल्याला मनस्ताप झाला, ज्ञानार्जन झाले पण ते आपल्या उपयोगी नाही आले आणि सर्वात मोठे नुकसान म्हणजे आपला मौल्यवान वेळ फुकट गेला. हातातून निसटलेला 'पैसा' परत येऊ शकतो पण निसटलेला एक 'क्षण' देखील कितीही किंमत मोजली तरी परत हातात येत नाही. आपल्या या अव्यवस्थितपणासाठी पण जवाबदार आपल्या डोक्यातील तोच "झटपट आनंद देणारा माकड"च आहे. आपण काही पण व्यवस्थित करायला गेलो की तो आपले लक्ष्य दुसऱ्या कामाकडे वेधतो आणि आपण देखील हातातले काम, पसारा तसेच टाकून त्या दिशेने जाऊ लागतो. परिणाम स्वरूप आपले घर, आपले कार्यस्थळ सर्व अव्यवस्थित आणि  पसरलेले दिसते. 

                 व्यवस्थितपणा आणण्यासाठी आपल्याला या माकडाकडे दुर्लक्ष करणे सुरु करायला हवे. सर्व कामांची एक यादी बनवायला सुरुवात करायला हवी, आपल्या 'स्मरण-शक्ती' वर अवलंबून न राहता  या यादीत लहान-मोठे प्रत्येक कामाची नोंद करायला हवी. कामांचे महत्व आणि तातडी (Urgency) ध्यानांत ठेऊन यादीतील प्रत्येक कामाला वरीयता क्रम (Priority Number) द्यायला हवा. वरीयता सूचीतील प्रथम क्रमांकाचे काम प्रथम असे क्रमवार एक-एक करून कामे पूर्ण करायला हवी. लहान-मोठे कुठलेही कार्य पूर्ण झाले की स्वत:ला शाबासकी देणे विसरू नये.  राहिलेल्या कामांसाठी 'आज नाही झाले काही हरकत नाही उद्या नक्की पूर्ण करीन', 'अवघड आहे पण अशक्य नाही' मनाला अश्या सकारात्मक सूचना देऊन स्वत:ला राहिलेल्या कामांसाठी प्रवृत्त करावे. सर्वात मोठे आणि महत्वाचे म्हणजे या माकडाच्या विलक्षण शक्तीचा उपयोग ही कामे कशी करता येतील यावर विचार करण्यात करावा. या माकडाची कल्पना-शक्ती फार विलक्षण आहे तो कामे करण्याचे सोपे मार्ग, नवीन कल्पना नक्की सुचवेल. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।



                



Friday, August 12, 2016

झटपट आनंद देणारा माकड आपल्या मेंदूचा ताबा कसा घेतो ? वेळ-व्यवस्थापन भाग-६ (Time Management Part-6)



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

वेळ-व्यवस्थापन विषयावर चिंतन करीत आपण बघितले की आपली दिनचर्या 'आदर्श' असण्यापेक्षा 'योग्य' असणे आपल्यासाठी हितकारक ठरते कारण ती आपण आपल्या 'सवयींचा', आपल्या 'रुचीचा', आपल्या नैसर्गिक 'कलाचा', आपल्या 'गुण-दोषांचा' आणि आपल्यासाठी योग्य 'दिशा आणि मार्ग' या सर्व गोष्टींचा विचार करून ठरवलेली असते.  आपली 'विशिष्ट' अशी दिनचर्या ठरविण्यासाठी आपण आपल्या मनाची उत्तम 'मशागत' करून 'मंथन' करून मग ही दिनचर्या ठरविलेली असते. जो फरक 'रेडीमेड' आणि 'शिंप्याकडे आपले माप देऊन शिवविलेल्या' कपड्यांमध्ये असते तोच फरक 'आदर्श दिनचर्या ' आणि 'योग्य दिनचर्या' मध्ये असतो. आपण 'रेडीमेड' कपड्यांमध्ये स्वत:ला 'एडजस्ट' करीत असतो, बऱ्याचदा ते आपल्याला फार 'टाईट' किंवा फार 'ढिले' असतात आणि आपण ते घालून स्वत;ला 'कॅम्फर्टेबल' फील नाही करत पण तरी विकत घेतले म्हणून घालणे भाग असते. याउलट 'शिंप्याकडून शिवविलेले कपडे' आपल्या 'माप' प्रमाणे असतात आणि 'ढिले' किंवा 'टाईट' नसून '
'कॅम्फर्टेबल'  असल्याने घालण्यास आवडतात. तसेच आपल्या 'योग्य दिनचर्या' प्रमाणे रोज चालणे आपल्याला सोपे आणि आनंददायी ठरते.

आपल्याला काहीही काम करण्यास सर्वात बाधक आपली एक वाईट सवय असते 'दिरंगाई करण्याची' 'चालढकल' करण्याची, आधुनिक व्यवस्थापनाच्या भाषेत या सवयीला Procrastination' म्हणतात.

आपल्या डोक्यात एक 'झटपट आनंदासाठी उड्या मारणारा एक माकड' असतो ज्याला आधुनिक व्यवस्थापनाच्या भाषेत 'Instant Gratification Monkey' असे म्हणतात आणि तोच आपल्या 'दिरंगाई करण्याच्या', 'चालढकल' करण्याच्या'  या वाईट सवयीसाठी कारणीभूत असतो. कुठलेही हितकारक कार्य करण्यापासून हे माकड आपल्याला सतत 'परावृत्त' करीत  असते किंवा पुढे ढकलण्यासाठी 'प्रवृत्त' करीत असते.

आपल्या मनांत काहीही काम करण्याचा विचार आला आणि आपण ते कार्य करण्याचा 'संकल्प' केला की 
हे माकड लगेच  आपल्याला बरेच  'विकल्प' सुचवते आणि आपल्याला त्या कार्यापासून दूर नेते. उदाहरणार्थ आपण ठरविले की उद्यापासून आपण रोज सकाळी ५ वाजता उठून 'योग' , व्यायाम करू. लगेच हे माकड आपल्याला अगदी तार्किक विकल्पे देऊ लागेल.'आज आपल्याला झोपण्यास उशीर झाला आहे , आपल्याला आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे आणि कमीत-कमी ६ तास झोपणे आवश्यक आहे' , ' उद्या रविवार आठवड्याचा शेवटला दिवस आहे आणि अमावस्या देखील आहे कुठलेही चांगले कार्य अमावस्येला सुरु करणे योग्य नाही आपण आठवड्याच्या पहिल्या दिवस सोमवार पासून सुरुवात करू' , ' योग किंवा व्यायाम करण्यापेक्षा आपण सुरुवात ध्यानापासून करायला हवी', ' आपण आधी रात्री लवकर झोपण्याची सवय लावून घेऊ म्हणजे सकाळी लवकर उठणे सोपे जाईल', 'आधी आपण आहारावर नियंत्रण प्राप्त करू मग योग व्यायाम याच्याकडे वळूया' , 'सकाळी व्यायामापेक्षा आपण 'जॉगिंग' पासून सुरुवात करू', ' आपण आधी नेटवरून आपल्यासाठी कुठली आसने उपयोगी आहेत याची माहिती गोळा करू, आसने कशी करायची हे जाणून घेऊ मग सुरुवात करू' .................................... असे या माकडाद्वारे असंख्य 'तार्किक' विकल्प आपल्याला पुरविल्यामुळे आपण पार 'गोंधळून' जाऊ. आपल्या निर्णय क्षमतेचा 'ताबा', आपले 'स्टेयरिंग'  हे  माकड नकळत आपल्या हातात घेईल आणि आपल्याला अन्य अनुपयोगी गोष्टींमध्ये रमवून यशाच्या उलट दिशेने नेऊ लागेल  आणि आपण देखील आनंद घेत-घेत फार दूर याच्या बरोबर निघून जाऊ.

आपल्याकडे एक म्हण आहे 'माकडाच्या हातात कोलित'. आपल्याला यशाच्या दिशेने नेणाऱ्या नौकेचा ताबा जर आपण या माकडाच्या हातात दिला, तर आपली नौका 'तरेल' की 'बुडेल' यावर विचार करणे फार गरजेचे आहे. 

या सतत त्रास देणाऱ्या माकडापासून आपल्याला मुक्ती हवी असेल तर आपल्याला आपल्या निश्चयावर 'ठाम' राहणे फार गरजेचे आहे, या माकडाला खाद्य न पुरवता त्याला आधी 'उपाशी' ठेऊन त्याचा 'ताबा' आपल्या हातात घेतला पाहिजे, आणि मग या माकडाला हळू-हळू आपल्या गरजेप्रमाणे 'प्रशिक्षण' देऊन त्याचा आपल्या हितासाठी उपयोग करून घ्यायला सुरुवात करायला हवी.  या माकडात विचार करण्याची विलक्षण शक्ती असते, आणि त्याच्या याच शक्तीचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतल्याने आपले कार्य फार सोपे होते, आपल्याला एक फुल-टाईम  'बिनपगारी' सेवक  उपलब्ध होतो ज्याच्या सेवेमुळे आपल्याला  फार उंच उडी मारणे सहज शक्य होते. 

उद्यापासून दोन-तीन दिवस या माकडापासून सावध कसे राहावे आणि याला प्रशिक्षण कसे द्यावे यावर विचार करूया.



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


Thursday, August 11, 2016

आपली दिनचर्या 'आदर्श' असावी की 'योग्य' असावी ? वेळ-व्यवस्थापन भाग-५ (Time Management Part-5)


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !
आपण वेळ व्यवस्थापन विषयावर चिंतन करीत काल बघितले की वेळेची किंमत कशी काढावी. आपण बघितले की वेळेची किंमत कळल्यावर पुढील योजना आखण्यास आपण प्रवृत्त होतो. योजना आखताना महान आणि यशस्वी विभूतींची चरित्रे वाचल्याने किंवा ऐकल्याने आपला आत्मविश्वास बळावतो आणि हळू-हळू आपले मन सकारात्मक विचारसरणी आत्मसात करून आपल्या मार्गात यशाच्या दिशेकडे अग्रसर होतो.

सकारात्मक विचारसरणी अंगीकार करून केवळ विचार करीत बसल्याने यश-संपादन होत नसते. आपल्या विचारांना आचरणांत आणल्याखेरीज, योजनेचे क्रियान्वयन केल्याखेरीज यश-संपादन होत नसते.आपण आखलेल्या योजनेचे क्रियान्वयन करतांना, मार्गात जर अनपेक्षित अडथळे निर्माण झाले, आपल्या अपेक्षेप्रमाणे परिणाम नाही मिळाले, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, तर या सर्व अडथळ्यांवर मात करत पुढचा मार्ग काढण्यासाठी सकारात्मक विचारसरणी उपयोगी पडते.
उत्तम वेळ-व्यवस्थापनासाठी आपल्याला आपली दिनचर्या ठरविणे फार गरजेचे आहे पण आपली दिनचर्या ठरविणे म्हणजे केवळ कागदावर "आदर्श टाईम-टेबल" बनविणे आणि त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करणे नव्हे. ज्याप्रमाणे शेतकरी पेरणी करण्यापूर्वी शेतातील 'खरपतवार' उपटून जमिनीची 'मशागत' करतात, त्याच प्रमाणे आपल्याला आपल्या मनातील अवांछित नकारात्मक आणि आळसात्मक विचार उपटून मनाची 'मशागत' करून मगच त्यात 'आदर्श दिनचर्या' ठरविण्यासाठी विचारांची पेरणी करावी. 

मनाची मशागत कशी करावी तर दिनचर्या ठरविण्यापूर्वी आपल्याला आपल्या वर्तमान दिनचर्येचे विश्लेषण करणे फार गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला एक आठवडा आपली 'अस्सल' दिनचर्येची एक 'लॉग-बुक' तयार करायला हवी आणि त्यात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला वेळ कसा आणि कुठल्या कामांमध्ये व्यतीत झाला हे तारीखवार आणि तास भराच्या अंतराळात नोट करीत राहावे.

आठवडा झाल्यावर लिहिलेल्या प्रत्येक तासाच्या कामाची विभागणी 'A' , 'B', 'C' आणि 'D' या विभागांमध्ये करावी. आवश्यक आणि महत्वपूर्ण अश्या कामांची   'A' , आवश्यक नाही परंतु महत्वपूर्ण अश्या कामांची  'B' आणि महत्वपूर्ण नाहीत पण आवश्यक अश्या कामांची  'C' आणि आवश्यक पण नाही आणि महत्वपूर्ण पण नाही अश्या कामांची  'D' विभागात स्वतंत्र विभागणी करून लिहावे. 


'आवश्यक', 'महत्वपूर्ण' आणि 'अनावश्यक' या तीनही परिभाषा व्यक्तीसापेक्ष असतात अर्थात प्रत्येक व्यक्तीची या तीनही  शब्दांची परिभाषा वेग-वेगळी असते. एकाला कुठले कार्य महत्वपूर्ण वाटते तर दुसऱ्याला ते अनावश्यक. येथे चारी प्रकारचे उदाहरण एका विद्यार्थ्याच्या दृष्टीने देणे मला गरजेचे वाटते जेणेकरून विषयाला समजणे सोपे जाईल.

महत्वपूर्ण आणि आवश्यक : विद्यार्थ्याच्या दृष्टीने परीक्षा डोक्यावर आल्यावर अभ्यासाचा वेळ वाढवणे, रात्री उशिरा पर्यंत जागून अभ्यास करणे  हे महत्वपूर्ण आणि आवश्यक दोन्ही आहे.

महत्वपूर्ण पण आवश्यक नाही : विद्यार्थ्याच्या दृष्टीने वर्षभर नियमित रूपाने अभ्यास करणे, आपल्या आहारा -संबंधी काळजी घेणे, नियमित रूपाने काही वेळ योग/व्यायाम करणे, आपली एकाग्रता निर्माण करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी 'ध्यान' करणे हे आवश्यक नाही पण महत्वपूर्ण आहे.

महत्वपूर्ण नाही पण आवश्यक : विद्यार्थ्याच्या दृष्टीने घराच्या मंडळीने अंतिम तिथी आल्यावर सांगितलेले विजेचे, टेलीफोनचे  बिल तातडीने अन्य महत्वाची कामे सोडून भरणे हे महत्वपूर्ण नाही पण आवश्यक आहे.

महत्वपूर्ण नाही आणि आवश्यक पण नाही : विद्यार्थ्याच्या दृष्टीने शाळा, कॉलेज, ट्युशन, कोचिंग, जिम सुटल्यावर मित्र -  मैत्रिणींबरोबर उगाच वायफळ गप्पा मारत आपला मौल्यवान वेळ फुकट घालविणे हे महत्वाचे पण नाही आणि आवश्यक तर मुळीच   नाही.


अश्याप्रकारे आपल्याला दिवसभरांत केलेल्या प्रत्येक कामाची विभागणी वरील चार भागात करून घ्यायला हवी. कुठले काम महत्वाचे आणि कुठले काम महत्वाचे नाही हे देखील ठरविणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही यासाठी आपल्याला प्रत्येक कामाची विभागणी करण्याआधी त्या कामाने आपल्याला काय साध्य झाले? आपण काय मिळविले? आपल्याला काय फायदा झाला? या कामाचा काय परिणाम होईल? शांत बसून असे प्रश्न स्वत:ला
विचारून , मग जे उत्तर मिळेल त्या प्रमाणे त्याची विभागणी करावी.

एक आठवड्याच्या या नोंदणीमुळे आपल्या समोर तथ्यावर आधारीत 'अस्सल' सामग्री विश्लेषणासाठी उपलब्ध असल्या कारणाने आपल्याला आपली 'रुची', आपला 'कल' ,  'आपले ध्येय' आणि आपली 'गरज' या सर्व बाजूनी विचार करून आपल्यासाठी 'योग्य दिनचर्या' ठरविता येईल. 'आदर्श दिनचर्या' अंगीकार करणे सोपे नाही पण 'योग्य दिनचर्या' अंगीकार करणे फार सोपे आहे कारण त्यात आपली ;रुची' , आपला 'नसर्गिक कल', आपली क्षमता' 'आपले गुण', 'आपले दोष' आणि 'आपल्या साठी योग्य मार्ग' या सर्व गोष्टींचा विचार आपण केलेला असतो आणि तिला अंगीकार केल्याने आपल्या वेळेचे उत्तम व्यास्थापन करणे संभव होते जेणेकरून आपल्या यशाचा मार्ग प्रशस्त आणी मोकळा  होत जातो.


म्हणून आदर्श दिनचर्येपेक्षा 'योग्य दिनचर्या' ठरविणे आणे त्यानुसार चालणे आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Wednesday, August 10, 2016

आपल्या वेळेची किंमत कशी काढावी ? वेळ- व्यवस्थापन - भाग -४ (Time Management -Part 4)


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

आपण वेळ व्यवस्थापन वर चिंतन करीत आहोत. काल आपण बघितले की आपल्याला बाळकडूच्या रूपांत मिळालेल्या काही शिकवणी बद्दल आपल्या फार चुकीच्या समजुती आहेत. 'आराम' हा 'हराम' नसून मर्यादित प्रमाणात, योग्य दिशा ठरविण्यासाठी केला असता 'वरदान' सिद्ध होतो आणि 'रिकामे डोके' हे 'सैतानाचे घर' नव्हे तर 'नवीन कल्पनांचे' , 'नवीन विचारांचे', 'नवीन योजनांचे' उद्गम स्थळ ठरते ! 

आज आपण "वेळेची-किंमत" या विषयावर चिंतन करूया.

लहानपणापासून आपल्याला आई-वडिलांकडून, गुरुजनांनकडून  'वेळेची किंमत करावी' अशी सूचना असंख्य वेळा मिळालेली आहे पण 'वेळ फार मौल्यवान आहे', 'गेलेला वेळ परत येत नाही' वेळेची केवळ एवढीच 
किंमत आपल्या मनांत रुजलेली आहे. वेळ-व्यवस्थापनासाठी आपल्याला आपल्या वेळेची 'खरी किंमत' कळणे फार गरजेचे आहे. वेळेची खरी किंमत कळल्याखेरीज आपल्याला  वेळेचे योग्य नियोजन करणे फार अवघड आहे. जो पर्यंत वेळेची किंमत आपल्याला आपल्या 'मिळकत' आपले 'उत्पन्न' या रूपांत नाही कळणार, तोपर्यंत आपण यावर 'गंभीरपणे' विचार करण्यास प्रवृत्त नाही होणार. 

वेळेची खरी किंमत एका उदाहरणाच्या माध्यमाने समजण्याचा प्रयत्न करूया. 

आपण गृहीत धरूया की आपला मासिक पगार रु.३०,०००/-  आहे आणि यासाठी आपल्याला महिन्यातून २५ दिवस ८ तास काम करणे गरजेचे आहे. आपण रोज ८ तास कामावर असतो पण कार्यालयातील मित्रांशी गप्पा, अंतर्जालावरील भ्रमंती, मित्र किंवा नातेवाईकांशी दूरध्वनिक चर्चेचा वेळ वगळला तर  रोज केवळ ६ तास 'खरे काम' करीत असतो. म्हणजे आपण महिन्यात ६ X २५ = १५० तास काम करून रु.३०,०००/- मिळवतो , आता   ३०००० / १५० = २००/-  म्हणजे  आपल्या एका तासाची किंमत रु.२००/- आहे आणि आपण जर एका दिवसातून
२  तास जरी फुकट घालविले तरी २ X २०० X ३६५ = १,४६,०००/- ,आपण वर्षभरांत
आपल्या स्वत: चे रु.१,४६,०००/- चे नुकसान करून घेतो. या उलट आपण २ तास रोज सार्थकी लावले तर आपण वर्षभरांत एवढीच रक्कम अधिक मिळवू शकतो. 

एका फार महत्वाच्या उदाहरणाने, एक छोटासा प्रयोग करून पाहूया.  

आपण महिन्यातून २५ दिवस काम करतो असे गृहीत धरले आहे म्हणजे आपण ५ दिवस महिन्यातून रजेचे मोजले आहे.  रजेच्या दिवशी आपण मुळीच काम करीत नाही, आपला संपूर्ण दिवस फुकट घालवतो. आपण जर रजेच्या ५ दिवसापैकी ४ दिवस ४ तास काम केले तर ४ X ४ X २०० = रु.३,२००/- X १२ महिने = रु.३८,४००/- ची अधिक मिळकत आपण एका वर्षात करून घेणे शक्य आहे. 

रजेच्या दिवशीच्या याच ४ तासांची गुंतवण (Investment) जर आपण आत्मावालोकन, आपल्या कार्याचे विश्लेषण करून 'आणखी उत्पन्न मिळविण्यासाठी काय करावे' या चिंतनांत, अभ्यासात, आपले संबंध वाढविण्यात केली, , स्वत;ला आधुनिक काळाच्या गरजेप्रमाणे परिवर्तीत करून घ्यायची सुरुवात केली तर हे उत्पन्न किती तरी पटीने वाढणे संभव आहे. आत्मावालोकन, चिंतन , विश्लेषण, संबंध वाढविणे इतर  या सर्व उपकरणांचा वापर करूनच लहानपणी पेपर वाटणारा व्यक्ती केवळ एक वैज्ञानिकच नव्हे तर देशाचा "राष्ट्रपती' होतो आणि 'चहा' ची टपरी चालविणारा व्यक्ती केवळ एका राज्याचा मुख्यमंत्रीच नव्हे तर देशाचा पंतप्रधान" होतो. हे दोनही उदाहरण परदेशातील नसून आपल्या भारतातलेच आहे आणि अनुकरणीय आहे. 

आपल्याला रिकाम्या वेळेत अश्या महान विभूतींचे चरित्र, यशोगाथा वाचायला हवी, ऐकायला हवी. महान विभूतींच्या चरित्रातून आपल्याला बरेच दिशा निर्देश, कल्पना तर मिळतातच प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची शक्ती देखील मिळते. अपयशाने खचून न जाता त्याला सकारात्मक दृष्ट्या स्वीकार करून मिळालेल्या अपयशातून या थोर विभूतींनी पुढच्या योजनेच्या आखणीसाठी कसा बोध घेतला हे कळल्यावर आपली विचारसरणी देखील सकारात्मक होऊ लागते. अपयशामुळे सर्व काही गमावून नव्याने शून्यापासून मोठे साम्राज्य पुन्हा उभे  करणे कसे शक्य होते हे थोर विभूतींच्या चरित्रातूनच कळते आणि नुसते कळत नाही तर हळू-हळू पटू देखील लागते, स्वत;वरचा गमावलेला आत्मविश्वास हळू-हळू पुन्हा निर्माण होऊ लागतो आणि यशाच्या मंदिराच्या पायऱ्या दृष्टीस पडू लागतात. एकदा यशाच्या पायऱ्या दिसू लागल्या की शिखर गाठणे काही अवघड नाही. 

आपले माजी राष्ट्रपती 'कलाम' साहेबांची आत्मकथा सुप्रसिध्द शायर आणि गीतकार 'गुलझार' साहेबांच्या आवाजात आपल्यासाठी येथे उपलब्ध करून देत आहे , ती ऐकण्यासाठी त्यांच्या खालील चित्रावर क्लिक करावे,



।। जय जय रघुवीर समर्थ ।।