Total Pageviews

Wednesday, August 24, 2016

आपल्या वेळेचे विश्लेषण कसे करावे ? वेळ-व्यवस्थापन भाग-१७ (Time Management Part-17)


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सुप्रभातम्  !

           काल आपण स्वयं-व्यवस्थापनामुळे आपल्याला वेळ-व्यवस्थापन कसे साध्य होते यावर विचार केला, आज आपण स्वयं-व्यवस्थापनाचे सर्वात महत्वाचे कार्य आपल्या "वेळाचे विश्लेषण" (Time Analysis) यावर चिंतन करूया कारण विश्लेषण केल्याशिवाय आपल्याला आपली वर्तमान स्थिती कळणार नाही आणि ती कळल्याशिवाय पुढची आखणी केली तरी त्यात यश मिळत नाही.

           आपल्या वेळाचे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला कच्चा माल अर्थात आपण आपला वेळ कुठे आणि कसा घालवतो आहे याचा 'डेटा' असणे अतिशय आवश्यक आहे. हा 'डेटा' गोळा करण्यासाठी आपण आपण सकाळी उठल्यापासून  रात्री झोपण्यापर्यंतच्या आपल्या वेळेची विभागणी ८ ते १० कालखंडात करावी. उदाहरणार्थ आपण सकाळी ६ वाजता उठून रात्री १० पर्यंत झोपत आहोत. सकाळी ८ ते रात्री १० पर्यंतच्या १६ तासांना दोन-दोन तासांच्या ८ कालखंडात वाटावे आणि प्रत्येक कालखंडापुढे तीन स्तंभ बनवावे. एका स्तंभात आपण त्या कालखंडाचा किती भाग 'उत्पादक' (Productive) कामांमध्ये घालविला, दुसऱ्या स्तंभात किती भाग 'अनुत्पादक' (Non-Productive) कामांमध्ये घालविला आणि तिसऱ्या स्तंभात आपला त्यावर आपली 'टीपणे' (Remarks) लिहायला हवे.  हे एक आठवड्या पर्यंत दररोज न विसरता सचोटीने लिहावे. सात दिवसात आपल्याला कळून येईल आपण आपल्या मौल्यवान वेळेचा किती भाग उत्पादक कामांमध्ये आणि किती भाग अनुत्पादक कामांमध्ये घालवितो आहे. मग हळू-हळू अनुत्पादक कामांमध्ये व्यतीत होत असणारा आपला वेळ कमी करायचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्याला  उत्पादक कामांसाठी वेळेची कमी पडणार नाही.

एक महत्वाची नोंद येथे करणे गरजेचे आहे की प्रत्येक व्यक्तीची 'उत्पादक' आणि 'अनुत्पादक' कामांची परिभाषा वेगळी असते. एखाद्या व्यक्तीसाठी अर्थार्जन अधिक महत्वाचे असते तर दुसऱ्यासाठी 'नाती जपणे' अधिक महत्वाचे असते, तर कुणाला समाजकार्याची आवड असल्यामुळे सामाजिक कार्यात गुंतलेला वेळ त्याला उत्पादक वाटतो. म्हणून उत्पादक आणि अनुत्पादक कामांची नोंद करतांना आपल्या 'गरजा' आणि 'रुची' दोन्हींला ध्यानात घेऊन ही नोंद करावी. 
अश्याप्रकारे तालिका बनवून त्यात नोंद करून मग उपलब्ध झालेल्या 'डेटा'चे विश्लेषण करावे.   



।। जय जय रघुवीर समर्थ ।।





No comments:

Post a Comment