Total Pageviews

Friday, August 12, 2016

झटपट आनंद देणारा माकड आपल्या मेंदूचा ताबा कसा घेतो ? वेळ-व्यवस्थापन भाग-६ (Time Management Part-6)



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

वेळ-व्यवस्थापन विषयावर चिंतन करीत आपण बघितले की आपली दिनचर्या 'आदर्श' असण्यापेक्षा 'योग्य' असणे आपल्यासाठी हितकारक ठरते कारण ती आपण आपल्या 'सवयींचा', आपल्या 'रुचीचा', आपल्या नैसर्गिक 'कलाचा', आपल्या 'गुण-दोषांचा' आणि आपल्यासाठी योग्य 'दिशा आणि मार्ग' या सर्व गोष्टींचा विचार करून ठरवलेली असते.  आपली 'विशिष्ट' अशी दिनचर्या ठरविण्यासाठी आपण आपल्या मनाची उत्तम 'मशागत' करून 'मंथन' करून मग ही दिनचर्या ठरविलेली असते. जो फरक 'रेडीमेड' आणि 'शिंप्याकडे आपले माप देऊन शिवविलेल्या' कपड्यांमध्ये असते तोच फरक 'आदर्श दिनचर्या ' आणि 'योग्य दिनचर्या' मध्ये असतो. आपण 'रेडीमेड' कपड्यांमध्ये स्वत:ला 'एडजस्ट' करीत असतो, बऱ्याचदा ते आपल्याला फार 'टाईट' किंवा फार 'ढिले' असतात आणि आपण ते घालून स्वत;ला 'कॅम्फर्टेबल' फील नाही करत पण तरी विकत घेतले म्हणून घालणे भाग असते. याउलट 'शिंप्याकडून शिवविलेले कपडे' आपल्या 'माप' प्रमाणे असतात आणि 'ढिले' किंवा 'टाईट' नसून '
'कॅम्फर्टेबल'  असल्याने घालण्यास आवडतात. तसेच आपल्या 'योग्य दिनचर्या' प्रमाणे रोज चालणे आपल्याला सोपे आणि आनंददायी ठरते.

आपल्याला काहीही काम करण्यास सर्वात बाधक आपली एक वाईट सवय असते 'दिरंगाई करण्याची' 'चालढकल' करण्याची, आधुनिक व्यवस्थापनाच्या भाषेत या सवयीला Procrastination' म्हणतात.

आपल्या डोक्यात एक 'झटपट आनंदासाठी उड्या मारणारा एक माकड' असतो ज्याला आधुनिक व्यवस्थापनाच्या भाषेत 'Instant Gratification Monkey' असे म्हणतात आणि तोच आपल्या 'दिरंगाई करण्याच्या', 'चालढकल' करण्याच्या'  या वाईट सवयीसाठी कारणीभूत असतो. कुठलेही हितकारक कार्य करण्यापासून हे माकड आपल्याला सतत 'परावृत्त' करीत  असते किंवा पुढे ढकलण्यासाठी 'प्रवृत्त' करीत असते.

आपल्या मनांत काहीही काम करण्याचा विचार आला आणि आपण ते कार्य करण्याचा 'संकल्प' केला की 
हे माकड लगेच  आपल्याला बरेच  'विकल्प' सुचवते आणि आपल्याला त्या कार्यापासून दूर नेते. उदाहरणार्थ आपण ठरविले की उद्यापासून आपण रोज सकाळी ५ वाजता उठून 'योग' , व्यायाम करू. लगेच हे माकड आपल्याला अगदी तार्किक विकल्पे देऊ लागेल.'आज आपल्याला झोपण्यास उशीर झाला आहे , आपल्याला आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे आणि कमीत-कमी ६ तास झोपणे आवश्यक आहे' , ' उद्या रविवार आठवड्याचा शेवटला दिवस आहे आणि अमावस्या देखील आहे कुठलेही चांगले कार्य अमावस्येला सुरु करणे योग्य नाही आपण आठवड्याच्या पहिल्या दिवस सोमवार पासून सुरुवात करू' , ' योग किंवा व्यायाम करण्यापेक्षा आपण सुरुवात ध्यानापासून करायला हवी', ' आपण आधी रात्री लवकर झोपण्याची सवय लावून घेऊ म्हणजे सकाळी लवकर उठणे सोपे जाईल', 'आधी आपण आहारावर नियंत्रण प्राप्त करू मग योग व्यायाम याच्याकडे वळूया' , 'सकाळी व्यायामापेक्षा आपण 'जॉगिंग' पासून सुरुवात करू', ' आपण आधी नेटवरून आपल्यासाठी कुठली आसने उपयोगी आहेत याची माहिती गोळा करू, आसने कशी करायची हे जाणून घेऊ मग सुरुवात करू' .................................... असे या माकडाद्वारे असंख्य 'तार्किक' विकल्प आपल्याला पुरविल्यामुळे आपण पार 'गोंधळून' जाऊ. आपल्या निर्णय क्षमतेचा 'ताबा', आपले 'स्टेयरिंग'  हे  माकड नकळत आपल्या हातात घेईल आणि आपल्याला अन्य अनुपयोगी गोष्टींमध्ये रमवून यशाच्या उलट दिशेने नेऊ लागेल  आणि आपण देखील आनंद घेत-घेत फार दूर याच्या बरोबर निघून जाऊ.

आपल्याकडे एक म्हण आहे 'माकडाच्या हातात कोलित'. आपल्याला यशाच्या दिशेने नेणाऱ्या नौकेचा ताबा जर आपण या माकडाच्या हातात दिला, तर आपली नौका 'तरेल' की 'बुडेल' यावर विचार करणे फार गरजेचे आहे. 

या सतत त्रास देणाऱ्या माकडापासून आपल्याला मुक्ती हवी असेल तर आपल्याला आपल्या निश्चयावर 'ठाम' राहणे फार गरजेचे आहे, या माकडाला खाद्य न पुरवता त्याला आधी 'उपाशी' ठेऊन त्याचा 'ताबा' आपल्या हातात घेतला पाहिजे, आणि मग या माकडाला हळू-हळू आपल्या गरजेप्रमाणे 'प्रशिक्षण' देऊन त्याचा आपल्या हितासाठी उपयोग करून घ्यायला सुरुवात करायला हवी.  या माकडात विचार करण्याची विलक्षण शक्ती असते, आणि त्याच्या याच शक्तीचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतल्याने आपले कार्य फार सोपे होते, आपल्याला एक फुल-टाईम  'बिनपगारी' सेवक  उपलब्ध होतो ज्याच्या सेवेमुळे आपल्याला  फार उंच उडी मारणे सहज शक्य होते. 

उद्यापासून दोन-तीन दिवस या माकडापासून सावध कसे राहावे आणि याला प्रशिक्षण कसे द्यावे यावर विचार करूया.



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


No comments:

Post a Comment