Total Pageviews

Friday, August 19, 2016

यशस्वी व्यक्ती यश-संपादनासाठी कुठल्या कार्यांची निवड करतांत? वेळ-व्यवस्थापन भाग-१३ (Time Management Part-13)



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !

                       वैज्ञानिक दृष्टीकाणातून स्टीफन कवे यांच्या मताप्रमाणे महत्वपूर्ण आणि तातडीचे या दोन आधारावर आपल्या कामांची विभागणी केल्याने या विभागणीचे काय परिणाम होतात ते आपण काल बघितले. आपण बघितले की आपला अधिकतम वेळ चौकोन १ मधील कामांमध्ये व्यतीत केला तर आपला मानसिक तणाव वाढतो, आपली शारीरिक प्रकृती खालवते आणि आपण सतत एक टाईम बॉम्ब हातात घेऊन तो फुटायच्या आधी अर्थात आपल्या कामांची मुदत संपण्याआधी ते काम कसे-बसे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो.आपल्या हृदयात आपले उद्दीष्ट नीट मुरलेले नसल्यामुळे आपण बऱ्याचदा आपला मौल्यवान वेळ चौकोन ३ मधल्या विना महत्वाच्या कामांमध्ये वाया घालवतो. आपण अशी कामे आपल्यासाठी महत्वाची आहेत की नाही ?, याने आपल्याला काही साध्य होणार आहे की नाही ? असा विचार न करता आपण केवळ ही कामे तातडीचे दिसून येतात म्हणून करतो. परिणामी आपल्या मनांत काही साध्य न झाल्यामुळे नकारात्मक भाव उत्पन्न होऊ लागतात. आपले 'लक्ष्य ठरविणे' ही संकल्पनाच आपल्या मनांत उदयास आलेली नसते म्हणून आपले 'नियोजन' आणि 'परिणाम' या दोन्हींची किंमत समजून न घेता आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून असल्या विन-महत्वाच्या कामांत आनंदाने गुरफटत राहतो. चौकोन ३ मधील कामे करून थकल्यावर, असल्या कामांचा वीट आल्यावर आपण चौकोन ४ मधील विना-तातडीच्या आणि विना-महत्वाच्या कामांकडे वळतो आणि तेथे आपला वेळ वाया घालू लागतो. चौकोन ३ आणि ४ मध्ये वावरताना बऱ्याचदा आपल्या हातून चौकोन १ मधील तातडीच्या आणि महत्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होते, ती कामे वेळेवर पूर्ण होत नाही ज्याच्या परिणाम स्वरूप आपल्याला भयंकर मानसिक त्रास, आर्थिक नुकसान आणि नोकरी सुटण्यासारखे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते आणि आपल्या पदरी पडते 'अवसाद', 'पश्चात्ताप' 'डिप्रेशन' ,'विषाद' जे न केवळ आपल्या मनाला पोखरते, आपल्या शारीरिक प्रकृतीवर देखील गंभीर दुष्परिणाम पाडते.

                           म्हणून स्टीफन कवे यांनी यशस्वी व्यक्तींच्या  सवयींचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला की यशस्वी व्यक्ती केवळ चौकोन २ च्या कामांना सर्वाधिक वेळ देतात. चौकोन ३ आणि ४ च्या कामांकडे मुळीच लक्ष घालीत नसल्याने त्यांना चौकोन २ च्या कामांसाठी अधिक वेळ मिळतो. चौकोन १ ची तातडीची, आणी-बाणीची कामे यशस्वी व्यक्तींच्याही जीवनांत येतातच पण यशस्वी व्यक्ती चौकोन २ च्या कामांना अधिक वेळ देऊन त्यांच्यावर मात करण्याची पूर्व-तयारी करून ठेवतात. आणी-बाणीच्या कामांचे, मार्गात येणाऱ्या अडथळ्यांचे पूर्वीच आकलन करून त्यांच्यावर संभावित उपाय शोधून , ठरवून ठेवतात. परिणामी त्यांच्या चौकोन १ मधील कामांच्या यादीचा आकार अगदी छोटा होतो व त्यांना अश्या  कामांमध्ये फारसा वेळ जात नाही. ते मानसिक तणावा पासून पूर्णपणे मुक्त, शारीरिक प्रकृतीने बळकट आणि टाईम बॉम्बला अगदी सहजपणे 'डी-फ्युज' करीत यशाच्या दिशेने पुढे मार्गक्रमण करीत राहतात. आणी-बाणीच्या प्रसंगांचा, मार्गातील अडचणींचा त्यांच्या मनावर मुळीच ताण पडत नाही. 

                             चौकोन २ मधील कामे म्हणजे यशस्वी व्यक्ती कोणत्या प्रकारची कामे करीत असतात हा विचार आपल्या मनांत उठणे अगदी साहजिकच आहे. चौकोन २ मधील कामे खालील सहा महत्वाच्या 'निकषांवर' (Criteria) आधारलेली असतात -


  • सुसंगतपणा -  आपले जीवनाचे ध्येय आणि आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी यात सुसंगतपणा असणे गरजेचे आहे. आपले ध्येय जो पर्यंत आपण ठरविलेले नसतील तोपर्यंत आपली दिशा ठरणार नाही आणि आपले पाऊल जर ध्येयाच्या दिशेने नसून उलट्या दिशेला उचलले गेले तर आपण ध्येयापर्यंत कधीच पोचू शकणार नाही, यश कधीच गाठू शकणार नाही. ध्येय ठरलेले नसेल आणि आपले पाऊल यशाच्या दिशेने जरी उचलले गेले तरी मार्गात पुढे येणाऱ्या असंख्य वळणांवर आपण योग्य वळणा वरच वळू याची काही "शाश्वती" (Guarantee) नाही. एखाद्या वळणावर आपले वळण चुकेल आणि आपण उलट्या दिशेने जाऊ लागू. याउलट जर आपले ध्येय ठरलेले असले, आपण त्याला मनापासून स्वीकारले असले तर ते आपल्या मनांत खोलवर रुजेल आणि आपल्याला डोळसपणे प्रत्येक वळणावर योग्य मार्गाचा  निवड करणे सोपे होईल. आपण योजनेची आखणी करतांना आपल्या वैयक्तिक 'ध्येय-वाक्याला' (Personnel Mission Statement) स्थान असणे फार गरजेचे आहे. योजनेच्या आखणीत आपल्या यशाच्या दिशेतील प्रवासाचा प्रत्येक टप्पा ठरलेला असला पाहिजे, स्पष्टपणे रेखांकित असला पाहिजे. आपल्या अर्जुनाप्रमाणे केवळ आपले लक्ष्यच नजरेस पडले पाहिजे तेव्हां आपले प्रत्येक पाऊल योग्य दिशेने उचलले जाईल.

  • संतुलन - जीवन जगताना आपल्या सर्व भूमिकांमध्ये आपले संतुलन असणे फार गरजेचे आहे. आई/वडील, पुत्र/पुत्री, पती/पत्नी,जावई/सून, सासरा/सासू,भाऊ/बहीण, काका/काऊ, मामा/मामी, आत्या/अतोबा, मित्र/मैत्रीण, मालक/नोकर, व्यावसायिक भागीदार ईतर सर्व भूमिकांचे अगदी  संतुलितपणे निर्वहन करणे आपल्याला आले पाहिजे. कुठल्याही नात्याची किंवा भूमिकेची अवहेलना न करता अगदी सहजपणे सर्व भूमिका हाताळता आल्या पाहिजे. आपले  आरोग्य, आपले कुटुंब, आपले व्यावसायिक संबंध, आपले सामाजिक संबंध  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या स्वत;ची "अपेक्षित छवी" यापैकी कुठल्याही एकाकडे दुर्लक्ष होता कामा नये. या सर्वांचे उत्तम संतुलन साधता आले पाहिजे.  या सर्वांसाठी आपल्या दैनंदिन कार्यक्रमांत स्थान असणे अतिशय गरजेचे आहे जेणेकरून हे संतुलन आपल्याला साधता येईल. 
         विस्तार भयामुळे आज येथेच विरमणे योग्य वाटते आहे. पुढील चार निकषांवर उद्या चिंतन करूया. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

No comments:

Post a Comment