।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुप्रभातम् !
आपण वेळ-व्यवस्थापन विषयावर चिंतन करीत आहोत. काल आपण बघितले की 'यश-संपादन' ची संकल्पना प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते जी वेळ-व्यवस्थापन केल्याने सहज सिद्ध होते. यश-संपादनासाठी केवळ 'हार्ड-वर्क' नव्हे तर 'स्मार्ट-वर्क' देखिल फार गरजेचे आहे. या दोन्हीं कार्य-पद्धतीचा आधार योग्य-प्रमाणात घेतल्याने कमी वेळात अधिक उंची गाठता येते.
आपल्या संस्कृतीने बाळकडूच्या रूपांत दिलेल्या काही शिकवणी मनावर इतक्या खोलवर कोरल्या जातात की वेळ-व्यवस्थापन आणि यश-संपादन दोन्हीसाठी बाधक ठरतांत. यापैकी सर्वाधिक बाधक दोन शिकवणी आहेत - ०१) आराम हराम आहे , आणि २) रिकामे डोके सैतानाचे.
यश-संपादनासाठी कठीण परिश्रम करणे गरजेचे आहे पण आपल्या शरीरासाठी 'आराम' आणि काम करण्याचा 'सोपा मार्ग' शोधणे देखील तेवढ्याच महत्वाचे आणि गरजेचे आहे. आजपासून काही वर्षापूर्वीपर्यंन्त जेव्हां दळण-वळणाची साधने नव्हती तेव्हां माणूस पायी, घोड्यावर, बैलगाडीवर प्रवास करायचा, तळे, नदी, समुद्राच्या दुसऱ्या तीरावर पोचण्यासाठी पोहणे, होडी,नौकेचा आधार घ्यायचा. जेव्हां माणसाला दळण-वळणासाठी अधिक सोयीची, आरामदायक प्रवासाची गरज भासू लागली तेव्हां हळू-हळू सायकल, दुचाकी, चारचाकी वाहने, बस, ट्रक,आगगाडी, ट्रेन , हेलिकॉप्टर, विमान ईतर साधनांचा अविष्कार झाला.
पूर्वी शेतात नांगरणी , रोपणी, सिंचन, पीककापणी साठी शेतकरी काबाड-कष्ट करीत होते. आज ट्रेक्टर, बोरिंग , पंप , थ्रेशर ईतर उपकरणांच्या आविष्कारामुळे शेतकऱ्यास बराच 'आराम' आणि 'सोयी' तर झाल्याच आहेतच त्याचे उत्पन्न देखील कितीतरी पटीने वाढले आहे. पूर्वी आपल्याला अन्न मिळवून देणाऱ्या अन्नदात्याच्या घरी काबाड-कष्ट केल्यावर देखील कित्येक दिवस 'उपासमार' घडत होती, आज आधुनिक साधनांचा वापर केल्यामुळे त्याचे उत्पन्न वाढत आहे, परिस्थिती सुधारत चालली आहे.
यश-संपादन आणि वेळ-व्यवस्थापन दोन्हीसाठी 'आराम' हा हराम नसून 'वरदान' सिद्ध होतो केवळ तो 'आळसामुळे' नसून 'गरज' म्हणून , सोपामार्ग शोधण्यासाठी म्हणून करायला हवा.
व्यवस्थापनाचे एक मोठे 'सूत्र' आहे - 'Delegation' अर्थात 'कार्य -वाटप' ! हे सूत्र आत्मसात केल्याने आपले काम फार सोपे होते. आपल्या संस्कृतीच्या 'स्वलाम्बन' या शिकवणीचा देखील आपण चुकीचा अर्थ लावून प्रत्येक काम स्वत; करण्याचा आग्रह धरतो आणि 'कार्य-वाटप' तेव्हांच करतो जेव्हां आपले काम कुणावाचून अडते किंवा एखादे काम करणे आपल्याला आवडत नसते किंवा एखादे काम करण्यात आपल्याला कमीपणा वाटतो.
कुणाला आपले कार्य सोपविणे आपल्याला फार 'जड' जाते ज्याचे कारणे आपण इतरांना सांगतो की 'त्या व्यक्तीला हे काम जमणार नाही' , 'त्याला याचा मुळीच अनुभव नाही' ! समजा आपण एखाद्या कार्याचे वाटप जरी केले तरी कुणाला निर्णय घेण्याचा अधिकार न देता त्या कार्याचे मुख्य सूत्र आपल्या हातात ठेवतो. जवाबदारीचे वाटप करतो पण निर्णय घेण्याचा अधिकार देत नाही ! अश्या प्रकारे कुणाला जवाबदारी न सोपविण्यामागचे मूळ कारण आपल्या मनातील 'भय' असते की 'कार्य दुसऱ्याला सोपविण्यामुळे माझे महत्व कमी होऊ शकते' आणि 'याला जर काम सोपविले तर मी काय करीन ?' आणि लगेच आपल्या विचाराचे समर्थन करण्यास आपल्या मनांत खोलवर कोरलेली 'रिकामे डोके सैतानाचे घर' ही शिकवण वर डोकावते आणि आपण लगेच 'स्वावलंबन' या शिकवणीचा दाखला देत आपल्या विचारांचे समर्थन करतो. आणि आपली हीच वृत्ती आपल्या वेळ-व्यवस्थापनात आणि यश-संपादनात बाधक ठरते, अडथळे निर्माण करते.
आपल्याला सकारात्मक विचारसरणी अंगीकार करून 'स्वावलंबन' पेक्षा 'परस्परावलंबन' या संकल्पनेचा आश्रय घेतला पाहिजे. दुसऱ्यावर काम सोपविताना त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, मार्गात येणाऱ्या अडचणी विषयी आणि त्या अडचणीवर मात करण्याविषयी, वेळ-परिस्थिती प्रमाणे निर्णय कसे घ्यायचे याविषयी त्याला दिशा-निर्देश देऊन त्याचे योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.
आपल्या अधीनस्थ व्यक्तीला प्रसन्न मनाने कार्य सोपवून , जवाबदारी सोपवून मोकळे होण्यात आपला स्वत:चा 'फायदा' आहे ! ज्याप्रमाणे वरच्या पायरीवर चढण्यासाठी खालच्या पायरीवरून पाय उचलावाच लागतो त्याचप्रमाणे जवाबदारी सोपविल्याने 'आपले' डोके ' रिकामे जरूर होते पण त्या रिकाम्या डोक्याचा जर पुढील 'योजने' च्या आखणीसाठी उपयोग केला तर 'रिकामे' डोके हे 'सैतानाचे' घर ठरत नाही. एखाद्या छोट्या 'जवाबदारी'तून 'मुक्त' झाल्याखेरीज 'मोठी जवाबदारी' स्वीकारणे शक्य होत नाही, स्वीकारली तरी ती जवाबदारी उत्तमरीत्या पूर्ण करणे फार कष्टप्रद होते.
आपण दोन दिवसात हे देखील बघितले की आपल्या सर्वांना एका दिवसात २४ तासच मिळतात. त्यात 'आराम हराम आहे ' हा विचार करून दिवसभर काबाड-कष्ट करीत राहिलो शरीराला आणि मेंदूला आराम नाही मिळाला तर आपल्या प्रकृतीवर तर प्रतिकूल परिणाम होईल. आपण रहाट-गाडग्यात अडकलेल्या 'बैला' सारखे एका ठराविक मार्गावर तिथल्या तिथेच फिरत राहू ! या उलट आपली छोटी-छोटी कामे, छोट्या-छोट्या जवाबदाऱ्या आपल्या अधीनस्थांना सोपवून स्वत; थोडे 'फ्री' झालो तर आपल्याला 'चिंतन' करण्यासाठी, "आत्मावलोकन' करण्यासाठी, 'विश्लेषण' करण्यासाठी 'वेळ' मिळतो जेणेकरून आपल्याला आपला उत्कर्ष साधण्याची, यश-संपादन करण्याची उत्तम 'योजना' आखणे सहज शक्य होते.
म्हणून 'आराम' हा 'हराम' नसून मर्यादित प्रमाणात, योग्य दिशा ठरविण्यासाठी केला असता 'वरदान' सिद्ध होतो आणि 'रिकामे डोके' हे 'सैतानाचे घर' नव्हे तर 'नवीन कल्पनांचे' , 'नवीन विचारांचे', 'नवीन योजनांचे' उद्गम स्थळ ठरते !
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
टीप : 'कार्य-वाटप' संबंधी समर्थांचे विचार जाणून घेण्यासाठी माझा लेख 'व्यवस्थापनाचा महामंत्र - महंते महंत करावे' अवश्य वाचवा .
लेखमाला उत्तम आहे. धन्यवाद!
ReplyDeleteधन्यवाद !
ReplyDeleteआपणांस Whats App द्वारे आपल्या भ्रमणध्वनी वर या विषयावरील पोस्ट्सचे alerts हवे असल्यास माझ्या Whats App भ्रमणध्वनी क्रमांक +91 98260 24137 वर संदेश करावा.
पुनश्च अभिप्रायाबद्दल धन्यवाद आणि आभार !
डॉ.अश्विन भागवत, उज्जैन