Total Pageviews

Sunday, August 7, 2016

भूमिका- वेळ-व्यवस्थापन भाग-१ (Time Management Part-1)





।। जय जय रघुवीर समर्थ ।।


सुप्रभातम् !


आजपासून आपण वेळ-व्यवस्थापन विषयावर चिंतन करणार आहोत !


परमेश्वरानी आपल्या सर्वांना आपल्या प्रारब्धाप्रमाणे रूप,लावण्य, रंग, धन, संपत्ती , वैभव, ऐश्वर्य, सुख, दु:ख ईतर उपहार जरी कमी-जास्त प्रमाणात दिले असे जरी आपल्याला वाटत असले तरी एक फार मौल्यवान वस्तू परमेश्वराने सर्वांना सम प्रमाणात दिली आहे. ती म्हणजे 'वेळ'!

कुणाकडे पैसा, संपत्ती अधिक प्रमाणात असेल तर कुणाकडे कमी प्रमाणात ! कुणाला रूप-लावण्य अधिक प्रमाणात असेल तर कुणाकडे कमी प्रमाणात ! कुणाला सुख अधिक मिळाले असेल तर कुणी दु:खाने त्रस्त झाला असेल. पण परमेश्वराने 'वेळ' हा उपहार सर्वांना सम-प्रमाणातच दिला आहे. याच उपहाराचे अचूक नियोजन केल्यामुळे, योग्य गुंतवणूक केल्यामुळे एक पेपर वाटणारा,होडीतून लोकांना पैलतीरी नेणारा बालक मोठा होऊन केवळ एक वैज्ञानिकच नव्हे तर देशाचा 'राष्ट्रपति' बनतो.

टाटा, बिरला, अंबानी, अडानी, सहारा सारख्या यशस्वी उद्योजकांना आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपति स्व.कलाम साहेब, स्वर साम्राज्ञी लता मंगेशकर, खेळाडू सचिन तेंडूलकर, लेखक आणि कवी गुलझार, चित्रकार एम.एफ.हुसैन, सारख्या शेकडो यशस्वी लोकांना परमेश्वराकडून मोजून एका दिवसात २४ तास हाच वेळ मिळाला होता आणि तेवढाच वेळ आपल्याला देखील मिळालेला आहे.

ही सर्व यशस्वी व्यक्ती दिवसातील संपूर्ण २४ तास काम करीत होती कां ? नाही ! मग त्यांनी असे काय वेगळे केले की त्यांना प्रतिकूल परिस्थितींना मात देत यशाचे शिखर गाठणे शक्य झाले आणि परिस्थिती अनुकूल असून देखील आपल्याला हवे तसे यश मिळत नाहीये ? हे आपल्या मनांत उद्भवणे साहजिक आहे.

उत्तर आहे की त्यांनी "आपल्या जवळ असलेल्या 'सीमित' वेळात आपल्या कामांची प्राथमिकता ठरविली, आपले लक्ष्य ठरवून त्या दिशेने वाटचाल सुरु केली, आपल्या वेळेचे अचूक नियोजन आणि योग्य गुंतवणूक केली."

आपल्याला देखील देवाने एका दिवसांत २४ तासच दिले आहेत ज्यातून दैनिक क्रियाकलाप, विश्राम आणि झोपेची वेळ वगळता केवळ ८ ते १० तासच नियोजनासाठी मिळतात ! याच ८ ते १० तासांचे योग्य नियोजन आणि अचूक गुंतवणूक केली की, यश गाठणे संभव होते !

याच २४ तासातून एक क्षण जर निसटला तर कितीही पैसा खर्च केला तरी तो क्षण पुन्हा आपल्या जीवनांत येत नसतो मग या २४ तासांतील एक-एक क्षणाला फुकट खर्च करावा की त्याची यश मिळविण्यासाठी योग्य गुंतवणूक करावी ? हा प्रश्न सारखा मनांत उद्भवू लागला की मगच त्याचे व्यवस्थापन व्यवस्थापन शक्य होते.

यशाची संकल्पना देखील प्रत्येक व्यक्तीची वेग-वेगळी असते ! एकाच्या दृष्टीकोणातून पाहिले तर पैसा, संपत्ती , ऐश्वर्य, वैभव मिळविणे म्हणजे 'यश' आहे तर दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोणातून प्रसिद्धी, मान-सन्मान मिळविणे म्हणजे 'यश' आहे तर तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकाणातून 'आध्यात्मिक' उत्कर्ष साधणे म्हणजे 'यश' आहे.

यशाच्या याच संकल्पनाचा थोडासा आढावा घेत, उद्यापासून आपण वेळ-व्यवस्थापनाच्या सिद्धान्तांवर चिंतन करूया !

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

1 comment: