।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुप्रभातम् !
काल आपण बघितले की आपल्या मौल्यवान वेळेचा आपण जर चिंतन, मंथन आणि योजनेच्या आखणीत 'गुंतवणूक' केली तर वेळ-व्यवस्थापना द्वारे आपल्याला अपेक्षेहून कितीतरी पटीने यश मिळेल. ही 'गुंतवणूक' करण्यासाठी काय करावे हा प्रश्न आपल्या मनांत उठणे अगदी साहजिकच आहे. खालील उपाय करून बघितल्यास आपली चालढकल किंवा दिरंगाई करण्याची सवय तर हळू-हळू जाईलच, आपले वेळ-व्यवस्थापन स्वत: होत जाईल-
- आपल्या वेळ-व्यवस्थापनामधील सर्वात मोठी अडचण आहे आपले अपूर्ण कामे. आपली बरीच कामे अपूर्ण राहिल्यामुळे आपण स्वत: वर मानसिक दबाव ओडवून घेतो आणि या मानसिक दबावामुळे बरीच कामे विसरून जातो कारण या सर्व कामांची एक 'अव्यवस्थित' यादी आपण आपल्या मेंदूत जपून ठेवतो ज्यात कामंची प्राथमिकता किंवा त्यांचा वरीयता ठरलेला नसतो. जेव्हां जे काम आठवते ते करण्याचा प्रयत्न आपण करीत असतो. आपल्या स्मृतीच्या किंवा स्मरण-शक्तीच्या मर्यादेमुळे बरीच कामे आपल्याला वेळेवर आठवत नाही व आपण ती विसरून जातो आणि वेळ- निघून गेल्यावर अपराध-बोध आपल्याला ग्रासू लागतो ज्याच्या आपल्या कार्य-क्षमतेवर देखील प्रतिकूल प्रमाण होतो. या साठी आपल्या जवळ एक छोटीशी डायरी किंवा वही आणि पेन्सील नेहमी ठेवावी, व आपल्याला जेव्हां जी कामे आठवतील त्या कामांची नोंदणी त्यात करावी. रात्री झोपताना देखील या दोन्ही वस्तू आपल्या जवळच असाव्यात कारण अधिकतर कामे रात्री झोपतांना आठवतात. पहिल्यांदा हे करायला आपल्याला बराच वेळ लागेल पण आपला हा वेळ फार सार्थकी लागणार आहे म्हणून या कामाला प्राथमिकता द्यावी. ज्या लोकांना मोबाईल, कम्प्यूटर, ईमेल आणी इंटरनेट वरील ई-कॅलेंडर सारख्या आधुनिक साधनांचा वापर करणे सोपे वाटते त्यांनी त्याचा उपयोग केला तर आणखी उत्तम.
- आपली यादी तयार झाली की त्या यादीला व्यवस्थित करणे फार गरजेचे आहे. यादीला व्यवस्थित करण्यासाठी त्यातील कामांवर शांतपणे विचार करावा की यातील कुठली कामे आपण करायला हवी आणि कुठली करायला नको कारण बरीच कामे गदी फालतू असतात, आपल्याला त्यातून काहीच मिळत नसते. आपण उगाच त्या कामांमध्ये लुडबुड करीत असतो. जी कामे करणे आपल्यासाठी मुळीच उपयोगी नसेल त्या कामांना यादीतून खोडून द्यावे. अश्याने आपली यादी आणि मानसिक दबाव दोन्हीं कमी होतील आणि आपल्या दिवसातील बराच वेळ वाचेल.
- यानंतर आपली खरी कार्य-योजना (Action Plan) आखणे सुरु होते कारण आपला कच्चा माल तैयार झालेला असतो. यानंतर आपल्या यादीची विभागणी तीन भागात करावी - १) कार्यालयीन, २) पारिवारिक आणि ३) धार्मिक,अध्यात्मिक किंवा सामाजिक. या तीनही विभागांचे प्रमाण आपापल्या प्रमाणे कमी-जास्त असू शकते पण तीनही प्रकारची कामे आपल्या यादीत असणे फार गरजेचे आहे कारण कार्यालयीन कामाने आपल्याला 'आर्थिक मिळकत' होते, पारिवारिक कामाने आपल्याला 'जवाबदारी पूर्ण केल्याचे समाधान मिळते' आणि धार्मिक, अध्यात्मिक किंवा सामाजिक कामांमुळे 'आपले आत्मोन्नयन होते, आपले जीवन कृतार्थ' होते.
कामांची विभागणी झाल्यावर आपल्या दिवस भराच्या २४ तासांची वेळाची विभागणी पण ६ भागात करावी - १) ६ ते ८ तास झोपेचा वेळ, २) ३ ते ४ तास दैनंदिन कामांचा वेळ, ३) ८ ते १० तास कार्यालयीन कामांचा वेळ, ४) २ ते ३ तास धार्मिक, आध्यात्मिक किंवा सामाजिक कामांचा वेळ, ५) २ ते ३ तास पारिवारिक दायित्व निर्वहनाचा आणि कौटुम्बिक मनोरंजनाचा वेळ आणि ६) किमान २ तास स्वत:च्या ज्ञानात वृद्धी करायचा, चिंतन, मनन आणि योजना आखणीचा वेळ.
अश्याप्रकारे दिवसातील २४ तासांची किंवा आठवड्यातील १६८ तासांची विभागणी करावी जेणेकरून आपल्याला आपले उद्दिष्ट पूर्ण करणे सोपे जाईल, कुठलेही दडपण आपल्यावर येणार नाही आणि अगदी सहजपणे वरील तीनही विभागातील कामांना वेळ देणे सोपे जाईल. - कामांची यादी आणि विभागणी झाल्यावर सर्वात मोठे कार्य आहे कार्य-वाटप किंवा जवाबदारी-वाटप. याला आधुनिक व्यवस्थापनाच्या भाषेत 'Delegation' म्हणतात आणि हाच यशाचा सर्वात भक्कम 'पाया' आहे. आपण लहानपणी गणिते सोडविताना 'एक व्यक्ती एका कामाला १० दिवसात करतो तर ५ व्यक्ती त्याच कामाला किती दिवसात करतील?' हे गणित पण नक्की सोडविले असेल. या शिकवणीचा आपण व्यावहारिक उपयोग करीत नाही जे करणे फार गरजेचे आहे. सगळी कामे आपण एकटे करीत बसलो तर कधीच वेळेवर पूर्ण होणार नाही म्हणून कार्य वाटप करणे फार गरजेचे आहे आणि ज्याला हे कळते त्याची यशाच्या दिशेने प्रवासाची गति कितीतरी पटीने वाढते. म्हणून कार्य-वाटप या सूत्राला अंमलात आणलेच पाहिजे. हे अमलात आणतांना आपल्या मनांत हे भय निर्माण होते की आपले महत्व कमी होईल पण असे मुळीच नसते कारण आपण खालच्या पायरीवरून पाय उचलून वरच्या पायरीवर पाय ठेवल्याखेरीज वर चढणे संभव होत नाही.
विस्तार भयामुळे आज येथे विरमणे योग्य आहे, उद्या याच विषयाला पुढे वाढवू.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
अतिसुन्दर
ReplyDeleteधन्यवाद !
Delete